पारोळ : वसई तालुक्यातील पर्यावरण धोक्यात आले असून ओसाड डोंगर, सुक्या नद्या, बुजलेले बावखले, विकासकांनी केलेली तिवरांची कत्तल, खदान माफियांनी नष्ट केलेले डोंगर, वनजमीनीच्या नावाखाली केलेली जंगल तोड, रेती माफियांनी केलेली नदीतील दगड गोटयांची लूट, विकासाच्या नावाखाली शहरी भागात केलेली वृक्ष तोंड यामुळे वसई पर्यावरण धोक्यात आले असून निसर्गाने नटलेली वसई आज भकास होण्याच्या मार्गावर आहे., व या पर्यावरणाचा ºहास रोखण्यात प्रशासकीय यंत्रणा मात्र नापास झाल्या आहेत.
मध्यंतरी सरकारने प्लास्टिक बंदी जाहीर केली. विशेष म्हणजे या प्लास्टिक बंदी घोषणेचे लोकांनी उत्स्फूर्त असे स्वागत केले. दंडाच्या भीतीपेक्षा लोकांना प्लास्टिक भस्मासूराची जास्त चिंता वाटली होती. सर्वसामान्य लोकांनी स्वत:हून प्लास्टिक पिशव्या वापरणे बंद केले. त्यांनी कापडी पिशव्या वापरण्यास सुरुवातही केली. भाजी, केळी वगैरे विकणाऱ्यांनीही प्लास्टिकच्या पिशव्या देणे बंद केले होते. तपासनीसांनी प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांविरुद्ध दंडाची कारवाईही सुरू केली होती. प्रसारमाध्यमातून येणाºया माहितीमुळे शहरांप्रमाणे अगदी ग्रामीण भागातही प्लास्टिक बंदी पाळली जाऊ लागली होती. परंतु मध्यंतरी काय झाले कोण जाणे, सरकारी आदेशाची कारवाई थंडावली. प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाºयांविरुद्ध करण्यात येणारी दंडाची कारवाईही थंड झाली. भाजीविक्रेत्यांनी पुन्हा प्लास्टिक पिशव्या वापरणे सुरू केले. कारवाई थंड झाल्याने त्यांच्या मनात भीती उरली नाही. वाईट याचेच वाटते की पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी सुरू झालेली ही विशेष मोहीम थंडावली. कायदा मोडण्याचे काहीच वाटेनासे झाले. प्लास्टिक बंदी हा केवळ एक निव्वळ फार्स ठरला. त्यामुळे येणाºया पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रकार चालूच राहणार आहेत.
मागील वर्षी काही भागांत पाऊस कमी पडला त्यामुळे यावर्षी बºयाच भागांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली पन्नास वर्षांत कोरड्या पडल्या नाहीत अशा विहिरी ही यंदा कोरड्या पडल्या, बोअरवेलचे पाणी खोल गेले मात्र अशावेळी पाण्याचे मोल आपणास कळू लागते.इमारतींची संख्या झपाट्याने वाढली झाडांची मात्र झाली कमी!
पाण्याचे खरे मोल अजूनही आपल्याला कळलेले नाही. बोअरवेल भूगर्भात इतकी खोल जाते की वसई ग्रामीण भागात ६०० फूट बोअरवेल मारूनही पाणी लागले नाही. पण, लाव्हारस बाहेर येईल की काय याची भीती वाटते.
शहरातील इमारतींची संख्या झपाट्याने वाढली पण झाडांची संख्या मात्र कमी झाली. वसईतील पर्यावरणाची हानी झाल्याने या भागात तापमानात ही वाढ झाली आहे.
पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सर्व प्रशासकीय यंत्रणा मात्र वृक्षारोपण करून आपण पर्यावरणाचे रक्षण केले असा आव आणतात पण त्यांनी लावलेली झाडे किती जिवंत राहिली हा प्रश्न आहे. वसईतील पर्यावरण वाचविण्यासाठी संस्थानी पुढे येण्याची गरज आहे.