विरार : सर्वसामान्य प्रवाशांसाठी लवकरात लवकर लोकल सेवा सुरू करावी, या मागणीसाठी विरार रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी संतप्त प्रवाशांनी आंदोलन केले. या घटनेमुळे रेल्वे स्थानकात तणावपूर्ण वातावरण होते.
कोरोनामुळे काही महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास बंद असल्याने याचा सर्व ताण बससेवेवर पडत आहे, मात्र यामुळे प्रवाशांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यातही बस मिळेल की नाही; याची शाश्वती नसते. त्यामुळे हा रोजचाच मनस्ताप झालेला आहे.
दरम्यान, दर दिवसाप्रमाणे सोमवारीही प्रवासी बससाठी रांगेत उभे होते. मात्र बसच्या अपुऱ्या संख्येमुळे नागरिकांची मोठी पंचाईत झाली होती. त्यामुळे बस स्थानकात उभे असलेले प्रवासी संतप्त झाले आणि ते रेल्वे स्थानकात पोहोचले.यावेळी प्रवाशांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत लवकरात लवकर लोकल सुरू करावी, अशी मागणी केली. या वेळी जवळपास शेकडोहून अधिक प्रवासी या अघोषित आंदोलनात सहभागी झाले होते.