हुसेन मेमन
जव्हार : जव्हार-मोखाडा तालुक्यातील कातकरी आदिवासी कुटुंबांची फरफट आजही सुरू आहे. वेठबिगारी म्हणून ठेवलेल्या दोन मुलींची घटना सध्या राज्यभर गाजत आहे. दोन धनदांडग्यांनी नगर जिल्ह्यातील तळेगाव येथे जव्हारच्या खेळण्याच्या वयातल्या दोन अल्पवयीन मुलींना किरकोळ पैशांत ‘गहाण’ ठेवून राबराब राबविले, जनावरांची विष्ठा उचलायला लावली. शाळेत जाण्याच्या वयात त्यांना शेळी-मेंढ्या चारण्याची वेळ आणून ठेवली. यावरून आदिवासींच्या नशिबी ‘गहाण’वटीचे जिणे असल्याचे दिसून येत आहे.
आदिवासी कुटुंबाने लहान मुलगी काळी (वय ६) ही अद्याप घरी आलेली नाही, असे सांगितले होते. तिच्या मोठ्या बहिणीने, मी जिथे काम करत होती, तिथे ती नव्हती. ती दुसरीकडे आहे, असे सांगितले होते, मात्र याबाबत पोलीस प्रशासन म्हणते की, छोटी मुलगीसुद्धा पालकांकडे आहे. त्यामुळे या घटनेला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. श्रमजीवी संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष धिंडा यांनी सांगितले, पीडित कुटुंबाला मंगळवारी अंत्योदय रेशनकार्ड काढून दिले. त्यांचे जातीचे दाखले मिळविण्यासाठी अर्ज केला व इतर कागदपत्रे मिळविण्यासाठी त्यांना मदत केली. त्यांची छोटी मुलगी त्यांच्या घरी नव्हती, असा दावा त्यांनी केला आहे.
मंगळवारी दिवसभर कार्यालयीन कामकाज करून सायंकाळी मी पीडित कुटुंबीयांच्या घरी गेलो होतो. त्यावेळी तेथे नरेशची मोठी मुलगी मनीषा होती, मात्र छोटी मुलगी काळी तिथे नव्हती. तिला शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.- संतोष धिंडा, तालुका अध्यक्ष, श्रमजीवी संघटनादोन्ही मुली पालकांच्या ताब्यात आहेत, आरोपीबाबत पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अहिरराव करत आहेत.- आप्पासाहेब लेंगरे, पोलीस निरीक्षक, जव्हार पोलीस ठाणे
अज्ञान, गरिबीचा घेतला जातोय फायदाआदिवासी हे अज्ञानी, गरीब असल्याने श्रीमंतांकडून नेहमीच त्यांची फसवणूक होत असल्याचे दिसून आले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना अशा घटना घडत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.