लोकमत न्यूज नेटवर्क नालासोपारा : पश्चिमेकडील डेपोमध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अनधिकृत दुचाकी आणि रिक्षांच्या वाहनांच्या पार्किंगमुळे येणाऱ्या जाणाऱ्या रहिवाशांना तसेच डेपोतील कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. वाढत्या अनधिकृत पार्किंगमुळे यावर कारवाई करण्यासाठी नालासोपारा आणि वाहतूक पोलिसांना पत्रव्यवहार करण्यात आला होता. वाहतूक विभागाला महानगरपालिकेने एक वर्षाच्या करारावर टोइंग व्हॅन दिल्यानंतर याठिकाणच्या अनधिकृत पार्किंग वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी ६८ वाहनांवर तर मंगळवारी ६१ वाहनांवर कारवाई करण्यात आली. नालासोपारा पश्चिमेला असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या बस डेपोलगतच नालासोपारा रेल्वे स्टेशन आहे. रेल्वेस्थानकात उतरणारे शेकडो प्रवासी या डेपोमधूनच ये-जा करतात. मात्र खासगी वाहने उभी केली जात असल्याने एसटी बसमधून प्रवास करण्यासाठी आलेल्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. या डेपोच्या शेजारीच वाहनतळ बनवलेला आहे. मात्र नागरिक तेथे वाहने उभी करण्याऐवजी येथेच उभी करतात. बेकायदा पार्किंग सुरू असल्याने या ठिकाणी एसटी महामंडळातर्फे फलक आणि दोन सुरक्षारक्षक नेमण्यात आले होते. त्यांच्यामार्फत गाड्यांना डेपोत जाण्यास मज्जाव करण्यात येत होता. मात्र तरीही बेकायदा वाहने पार्किंग सुरूच होते. शेवटी वाहतूक विभागाने सोमवारपासून या खासगी वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
या डेपोमध्ये दररोज शेकडो दुचाकी व चारचाकी वाहने बिनधास्तपणे पार्किंग केली जातात, तर दुसरीकडे रिक्षाचालकसुद्धा थेट डेपोमध्ये रिक्षा घेऊन येत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी कोणत्या ठिकाणाहून चालायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत अनेक वेळा स्थानिक आणि वाहतूक पोलिसांना पत्रव्यवहार करण्यात आला होता. वाहतूक विभागाला टोइंग व्हॅन मिळाल्यानंतर सोमवारपासून कारवाईला सुरुवात केली आहे. - प्रज्ञा सानप, आगार व्यवस्थापक, नालासोपारा
एसटी महामंडळाने अनधिकृत पार्किंगबाबत तक्रारी केल्या होत्या. टोइंग व्हॅन उपलब्ध नसल्याने कारवाई करण्यास अडथळा निर्माण झाला होता. पण आता मनपाने टोईंग व्हॅन दिल्यानंतर सोमवारपासून कारवाईला सुरुवात झाली आहे. ही वाहने उचलून डेपोत जमा करण्यात येतात. वाहनांच्या मालकांकडून दंड वसूल करून वाहने सोडून देतो. दोन दिवस कारवाई केली व अजून सुरू आहे. - शेखर डोंबे, पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग वाहतूक विभागाने केलेल्या कारवाईचे आम्ही स्वागत करीत आहोत. आम्हा प्रवाशांना या खासगी गाड्यांमधून रस्ता काढणे जिकरीचे झाले होते. त्यामुळे अशी कारवाई दररोज झाली तर आम्हा रेल्वे प्रवाशांचा मार्ग यामुळे मोकळा होणार आहे. - आशिष कर्णिक, रेल्वे प्रवासी