पंकज राऊतबोईसर : लोखंडी चॅनलच्या आधारावर उभ्या असलेल्या बोईसर ग्रामीण रुग्णालयाची इमारत कधीही कोसळण्याच्या स्थितीत असल्याने अखेर ते रुग्णालय बंद करण्यात आले आहे, मात्र बोईसरपासून १२ कि.मी. अंतरावर असलेल्या तारापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात हे रुग्णालय तात्पुरते सुरू केल्याने हजारो गोरगरीब रुग्णांना तारापूरला जाणे खूप खर्चिक व गैरसोयीचे असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.ग्रामीण रुग्णालयात बोईसर पूर्व परिसरातील खेडेगावातून गोरगरीब आदिवासी आणि तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या कुटुंबाबरोबरच परिसरातील विविध आजारांचे शेकडो रुग्ण रोज मोठ्या संख्येने येत असत. मात्र ग्रामीण रुग्णालयाची इमारत वापरण्यास योग्य नसल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम खात्याने दिला असतानाही या धोकादायक इमारतीमध्ये प्रतिदिन शेकडो रुग्णांवर उपचार केले जात होते. यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये ‘आरोग्य सेवेच्या कर्मचाऱ्यांबरोबरच रुग्णांच्या जीवाला धोका’ असे वृत्त प्रसिद्ध केले होते.या रुग्णालयात विविध साथीच्या आजारांच्या रुग्णांसह अपघात झालेले, साप व कुत्रा चावलेले, बाळंतपण, विविध प्रकारचे लसीकरण, रक्त तपासणी असे सुमारे दोनशे ते अडीचशे रुग्ण प्रतिदिन बाह्य व आंतररुग्ण विभागात उपचारांसाठी येत होते. त्यांच्या नातेवाइकांची वर्दळही खूप होती. दरम्यान, हे रुग्णालय तारापूर येथे हलविल्यामुळे तारापूरला सहा आसनी रिक्षाचे भाडे रु. २५/- असून एका नातेवाइकांसह दोघांना तेथे जाण्या-येण्यासाठी शंभर रुपये खर्च एका फेरीचा होतो. त्यामुळे गरिबांना तारापूर हे आर्थिक दृष्टीने अजिबात परवडणारे नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
रुग्ण व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक इमारतीमध्ये रुग्णसेवा सुरू ठेवणे अत्यंत जोखमीचे होते. त्यामुळे आरोग्य विभागाने बोईसर येथे भाड्याने जागा शोधल्या, परंतु त्यामध्ये काही तांत्रिकदृष्ट्या अडचणी आल्याने शेवटी पर्याय नसल्याने तारापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या ग्रामीण रुग्णालय सुरू केले असून भाड्याची जागा शोधण्यात येत आहे. आम्ही ग्रामपंचायतीलाही जागेसाठी विनंती केली आहे. - डॉ. राजेंद्र केळकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, पालघर