हितेन नाईक
पालघर : चक्रीवादळात वडराईच्या समुद्रात अडकून पडलेल्या बार्जमधील डिझेल समुद्रात पसरू नये म्हणून बिडको येथील एका कंपनीत प्रशासनाच्या देखरेखीखाली सुरक्षित ठेवण्यात आला होता, मात्र या हजारो लिटर्स साठ्याला बेकायदेशीर साठा ठरवीत त्याविरोधात तक्रारी करण्यात आल्या होत्या. अधिक चौकशीअंती सुरक्षित ठेवलेला डिझेलचा साठा संबंधित कंपनीकडे सुपूर्द करण्याची परवानगी जिल्हाधिकारी स्तरावरून झाल्यानंतर हा साठा मालकाच्या ताब्यात देण्यात आला.
१७ मे रोजी झालेल्या चक्रीवादळात एम.एस. तिरुपती वेलसर्स या कंपनीचा बार्ज भरकटला जाऊन तो वडराईच्या समुद्रातील खडकात अडकून पडला होता. अनेक दिवस हा बार्ज अडकून पडल्याने त्यामधील डिझेल साठ्याच्या टाकीला गळती होऊन समुद्रात प्रदूषण निर्माण होईल या भीतीने वडराई मच्छीमार संस्थेने हा डिझेल साठा सुरक्षित हलविण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. त्या मागणीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये एमईआरसी कंपनीने तात्काळ आपल्या बार्जमधील पाणीमिश्रित असलेले डिझेल व स्लज चिन्तुपाडा येथील एका कंपनीत ठेवण्याबाबत दोन महिन्याचा करार केला होता.
चिंतुपाडा येथील परिसरात असलेली मानवी वस्ती आणि औद्योगिक क्षेत्र परिसर पाहता सुरक्षिततेच्या दृष्टीने हा इंधनाचा साठा सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावा, अशा लेखी सूचना सातपाटी सागरी पोलिसांनी बजावल्या असता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार यांनी घटनास्थळी जाऊन तो भाग सील केला होता. या कंपनीकडे इंधन साठवणुकीची परवानगी नसली तरी आपत्कालीन परिस्थितीत समुद्रात डिझेल पसरून प्रदूषण वाढून मच्छीमार आणि त्यांच्या व्यवसायाचे नुकसान होऊ नये, या हेतूने कंपनीने तात्काळ डिझेल साठा हलविण्याची तत्परता दाखवली. अखेर गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीला लावलेले सील काढून टाकण्याचे आदेश देत साठवणूक केलेल्या डिझेलच्या साठा इतरत्र सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना दिल्या. यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळ व डीजी शिपिंग विभागाची परवानगी असल्याने कायदेशीर मार्गाने बाहेर काढण्यात आलेला साठा गुरुवारी रात्री इतरत्र हलविण्यात आल्याने अनेक दिवसांपासून या प्रकरणावर सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे.