पालघर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथी प्रमाणे येणारी ३८७ वी पालघर जिल्ह्यातजयंती वसई पूर्व भागातील गावागावात मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी प्रत्येक ठिकाणी शिव भक्ती टिपेला पोहचली होती. तर जागोजागी रस्त्यांच्या कडेला, कार, बाईक, ट्रक अशा गाड्यांवर, घराच्या छतांवर भगवे ध्वजच ध्वज दिसत होते. यावेळी बर्याच गावात सत्यनारायण महापूजा, कथाकथन, पोवाडे गायन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पारोळ येथे सकाळपासूनच महाराजांचे बुलंद पोवाडे गर्जत होते. सकाळी शिवप्रतिमेचे पूजन झाले. शिवाजी महाराजांच्या चरित्रावरील व्याख्यान खानिवडे येथे झाले. त्यानंतर शिवाजी महाराज कि जय या जय घोषाने झेडपी सदस्या कल्याणी तरे यांच्या सह महिलांची बाईक रॅली सुरु झाली. विभागातील गावा गावांनी एकत्र मिळून काढलेली ही रॅली उत्सवाचा केंद्रबिंदू ठरली. पारंपारिक वेशभूषेतील व भगवे फेटे परिधान केलेल्या महिलांचा मोठा सहभाग हा या रॅलीचे वैशिष्ट्य ठरला. जवळपास २५० च्या वर बाईक व २५ च्या घरात चार चाकी वाहने होती. याचप्रकारे वसई पूर्व ,गोखीवरे ,वालीव, कामण ,विरार , विरार पूर्व आदी तालुक्याच्या भागात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . पोलिसांनी बंदोबस्त चोखला ठेवला होता.
सर्वत्र शिवजयंती उत्साहात
By admin | Published: March 16, 2017 2:45 AM