अनिकेत घमंडी, डोंबिवलीराज्याचे माजी मुख्यमंत्री अवघ्या दोन वॉर्डांच्या प्रचारासाठी डोंबिवलीत आल्याने आघाडीची अवस्था किती केविलवाणी झाली आहे हे स्पष्ट झाले. सोमवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तर मंगळवारी प्रांताध्यक्ष खासदार अशोक चव्हाण हे या ठिकाणी आले होते. सोमवारी चव्हाण यांनी पूर्वेकडील दत्तनगर आणि आयरेगाव या दोन ठिकाणी पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या. तर मंगळवारी पश्चिमेला गावदेवी, जयहिंद कॉलनी आणि प्रसाद सोसायटी या ठिकाणी जाहिर प्रचारसभा घेण्यात आली. यामुळे त्या उमेदवारांना बळ मिळालेले असले तरीही मैदान भरवतांना मात्र नाकीनऊ आल्याचे स्पष्ट झाले. अन्नधान्यांचे वाढलेले भाव याबाबत सडकून टीका केली. मात्र हे दोन्ही मुद्यांसह पॅकजसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यावर मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी टीकेची झोड उठविली होती. त्याहून वेगळे असे भाषण काँग्रेस नेत्यांनी केले नसल्याने नागरिकांचा हिरमोड झाला. नागरिकांना या ठिकाणची पाणी समस्या, कचरा समस्या, रेंगाळलेला बीएसयुपी प्रकल्प यावर भाष्य करणे अपेक्षित होते. तसेच नुकतीच लागू केलेली पाणीकपात याबाबतही राज्यासह स्थानिक प्रशासनावर टीकेची झोड घेणे अपेक्षित होते. तसे मात्र काहीच झाले नाही. स्थानिक स्तरावर क्लस्टर, वाहतूककोंडी, अनधिकृत बांधकामे यासह अन्य नानाविध प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे या सर्वांची दखल घेऊन चव्हाण यांच्यासारखे अनुभवी नेतृत्व बोलतील आणि या ठिकाणच्या ‘रिंग’ची पोलखोल करतील असेही वाटले होते. केडीएमसीतील भ्रष्टाचाराची पाळमुळे किती खोलवर रुचली आहेत, त्याला सत्ताधारी कसे जबाबदार आहेत, नागरिकांच्या करापोटी येणाऱ्या रकमेचा मलिदा कसा लाटण्यात आला, यावर भाष्य करतील असे वाटले होते, परंतु त्या सर्वावर पाणी फिरवले गेल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
अवघ्या दोन वॉर्डांसाठी माजी मुख्यमंत्र्यांची डोंबिवलीत पायधूळ
By admin | Published: October 28, 2015 12:47 AM