लोकमत न्यूज नेटवर्क,
नालासोपारा : वसईत रविवारी संध्याकाळी बंद घरात तीन तरुणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ माजली आहे. आजूबाजूच्या रहिवाशांनी घरातून वास येत असल्याकारणाने माणिकपूर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी नवघरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले आहे. ही घटना नेमकी कश्यामुळे घडली याचा पोलीस शोध घेत तपास करत आहे. सदर घटना गॅस लिकेजमुळे झाली असेल असा पोलिसांनी दाट संशय व्यक्त केला आहे.
माणिकपूर नाक्याच्या नवपाडा रोड आशा सदन चाळीत मे महिन्यापासून भाड्याने राहणाऱ्या व मूळ उत्तर प्रदेशच्या गौंडा येथील रहिवाशी मोहम्मद आजम मोहम्मद सलीम (३१), शफी अहमद रफी अहमद (२६) आणि सादिक अली (२८) यांचा मृत्यू झाला आहे. १ ते ३ फेब्रुवारी दरम्यान ही घटना घडली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. बंद घरातून वास येत असल्याने आजूबाजूच्या लोकांनी घरमालक सुरेश आल्मेडा यांना कळवले. नंतर त्यांनी सदर बाब माणिकपूर पोलिसांना कळवली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी पाठवून पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी पाठवले आहे. घराचा दरवाजा आतून बंद होता. गॅस लिकेजने ही घटना झाल्याचा संशय आहे. नेमकी घटना कशामुळे झाली हे शवविच्छेदन अहवाल आल्यावर स्पष्ट होईल.
- संतोष चौधरी, (पोलीस निरीक्षक, गुन्हे, माणिकपूर पोलीस ठाणे)