नवी मुंबई : बाबांनी दाखविलेल्या मार्गावरून निरपेक्ष भावनेने आम्ही चालत राहिलो. आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत आहे. सर्वांच्या सहयोगातून चांगले काम उभे राहिले. हे काम पाहून तरुणांमध्येही समाजकार्याविषयी प्रेरणा निर्माण होत असल्याचे समाधान वाटत असल्याचे मत ज्येष्ठ सामाजसेवक प्रकाश बाबा आमटे यांनी व्यक्त केले आहे.
वाशीमधील श्री सोमेश्वर शिवमंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने डॉ. प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे यांच्या मुलाखतीचे आयोजन केले होते. नगरसेवक प्रकाश मोरे, शिल्पा मोरे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. लोकमतचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर व अभिनेत्री अनुपमा ताकमोघे यांनी घेतलेल्या मुलाखतीतून आमटे दाम्पत्याच्या जनसेवेचा माहितीपट नवी मुंबईकरांसमोर उलगडला. या वेळी प्रकाश आमटे म्हणाले की, आनंदवनचे काम सुरू असताना बाबांनी एक दिवस भामरागडला सहलीसाठी नेले. आम्हाला पाहून आदिवासी जंगलात पळून जाऊ लागले. त्यांचे दारिद्र्य, शिक्षणाचा अभाव व इतर समस्या पाहावयास मिळाल्या. त्याच ठिकाणी या आदिवासींच्या विकासासाठी काम करण्याचा शब्द बाबांना दिला व हेमलकसाच्या कामाला सुरुवात झाली. राहायला घर नव्हते, दळणवळणाची साधनेही नव्हती. ज्यांच्यासाठी काम सुरू केले ते जवळ येत नव्हते. आदिवासींचा विश्वास संपादन करून त्यांची भाषा शिकून कामाला सुरुवात झाली. रुग्णांवर उपचार करण्यास सुरुवात केली. येथील मुलांसाठी शाळा सुरू केल्या. आदिवासींना शेतीपासून सर्व प्रकारचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली. निरपेक्ष भावनेने हे काम सुरू होते.आदिवासींचे प्रश्न सोडविण्याचे काम सुरू असताना मॅगसेसे पुरस्कार मिळाला. बाबांनाही हा पुरस्कार मिळाला होता. या पुरस्काराची प्रसारमाध्यमांनी दखल घेतली. चित्रपट, बिल गेट्सनी घेतलेली दखल, महानायक अमिताभ बच्चनच्या कौन बनेगा करोडपतीचे काम या सर्वांमुळे हेमलकसाचे काम घराघरांमध्ये पोहोचले व हेमलकसाकडे देशभरातील नागरिकांचा ओघ वाढला. येथील काम पाहून तरुणांमध्ये समाजकार्याची आवड निर्माण होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आमटे कुटुंबातील तिसरी पिढीही व सहकाऱ्यांचीही दुसरी पिढी या कामासाठी झोकून देत असल्याचा आनंद होत असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. मंदाकिनी आमटे यांनी आदिवासींसोबत काम करण्यासाठी गेल्यानंतर आतापर्यंतच्या परिस्थितीचे सांगितलेले वर्णन केले. मुलांनाही आदिवासींसोबत शाळेत शिकविले. नातवंडेही तेथेच मराठी शाळेत शिकत आहेत. मुलांसोबत सुनांनीही समाजकार्यात वाहून घेतल्याचा अभिमान असल्याचेही सांगितले. सर्वांच्या सहकार्यातून हे काम उभे आहे. अनेकांनी मोठ्या देणग्या दिल्या. पण एका व्यक्तीने दिलेली दहा रुपयांची मदत खूप मोलाची वाटते.