सुनील घरतपारोळ : वसई-विरार महापालिकेने यंदा करवसुलीचे सुमारे ३०० कोटींचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. करवसुलीचे हे उद्दिष्ट साध्य व्हावे यासाठी अनेक मार्गांचा अवलंब केला जात आहे. प्रसंगी मालमत्ता जप्तीचा मार्गही पालिका प्रशासनाने अवलंबला आहे.आर्थिक वर्ष संपायला केवळ एक महिना शिल्लक असून या एका महिन्यात पालिकेला आपले उद्दिष्ट पूर्ण करायला घाम गाळावा लागणार आहे. सध्या महापालिकेने थकलेली कर वसुली महापालिका प्रशासनाकडे भरणा करण्यासाठी पालिका क्षेत्रात ठिकठिकाणी बॅनर झळकवले असून त्यामार्फत नागरिकांना मालमत्ता कर, पाणीपट्टी कर भरण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. वसई-विरार शहर महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील सन २०१९-२० या आर्थिक वर्षातील सर्व थकबाकीधारकांनी आपली थकबाकी भरावी व महापालिकेला सहकार्य करावे, यासाठी जानेवारी महिन्याआधीपासूनच पालिकेच्या मालमत्ता कर भरणा विभागाने सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत पालिका क्षेत्रात वास्तव्य करणारे मालक/धारक यांनी आपला मालमत्ता कर व पाणीपट्टी कराची थकबाकी त्वरित प्रभाग समिती कार्यालयात भरणा करावी, थकबाकी कराचा भरणा न केल्यास सदर मालमत्तेचे नळ कनेक्शन खंडित करण्यात येईल व संबंधित नागरिकांच्या मालमत्तेवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूची (ड) प्रकरण ८ (कराधान नियम) ४२ व ४३ अन्वये जप्तीसारखी कटू कारवाई करण्यात येईल. अशा आशयाचे बॅनर वसई-विरार शहर महापालिकेने सध्या महापालिका क्षेत्रात झळकवले आहेत.वसई-विरार महानगरपालिकेचा आवाका सध्या वाढत आहे. दरवर्षी करवसुलीचे उद्दिष्ट वाढवण्यात येते. या वर्षी सुमारे ३०० कोटींचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. करवसुली करण्यासाठी विविध युक्त्या पालिका प्रशासनाकडून राबवण्यात येतात. यंदा थकबाकीदारांच्या मालमत्तेवर जप्ती आणणे व जोपर्यंत कर भरणा केला जात नाही, तोपर्यंत मालमत्ता संबंधित थकबाकीदाराच्या स्वाधीन करण्यास पालिकेने हरकत घेतली आहे.।ूमहापालिकेचे सहकार्याचे आवाहनवसई-विरार शहर महानगरपालिकेने करवसुली उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विविध उपाय योजण्यास सुरुवात केली आहे. यानुसार पाणी कनेक्शन खंडित करणे, वीज कनेक्शन खंडित करणे असे प्रकार पालिकेने हाती घेतले आहेत. आता कर वसुलीसाठी पालिका प्रशासनाकडे केवळ एक महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. त्यानुसार पालिका कर्मचारी कामाला लागले आहेत. वसई-विरार शहर महापालिकेने ठिकठिकाणी नागरिकांना कर भरणा करण्यासाठी पालिकेला सहकार्य करावे, असे बॅनर लावण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ही मोहीम जोरदारपणे राबवली जात आहे. पालिकेचे कर्मचारी करवसुलीचे उद्दिष्ट साध्य व्हावे यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करताना दिसत आहेत. येत्या ३१ मार्चपर्यंत कर्मचाऱ्यांना उद्दिष्टपूर्ण करायचे आहे.
करवसुली उद्दिष्टासाठी वसई पालिकेची कसरत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2020 11:38 PM