नालासोपारा : वसई तालुक्यातील चंद्रपाडा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कॉस पाॅवर प्रा. लि. या इलेक्ट्रिकल पार्ट्स आणि पॅनल बोर्ड बनविणाऱ्या कारखान्यात बुधवारी दुपारी हायड्रोजन सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात तीन कामगारांचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे, तर आठ कामगार जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
संध्याकाळी आग विझवण्यात यश आले असून तीव्र स्फोट झाल्यानंतर लागलेल्या आगीने भीषण रूप धारण केले होते. स्फोटामुळे जवळपासचे कच्चे बांधकाम आणि कारखान्याचेही नुकसान झाले आहे. वसईच्या चंद्रपाडा भागात कॉस पावर प्रा. लि. कंपनी आहे. त्यात इलेक्ट्रिक पार्ट्स आणि पॅनल बनविले जातात. बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास कंपनीत अचानक हायड्रोजन सिलिंडरचा स्फोट झाल्याचे सांगण्यात आले. मोठा आवाज होत बॉयलर फुटल्याने आग लागली. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले.
आगीच्या उंच ज्वाळा पाहून आजूबाजूचे लोक घाबरले. अपघातावेळी कंपनीत कामगार काम करत होते. या अपघातात तीन कामगार होरपळले, तर आठ कामगार भाजले. अपघाताची माहिती मिळताच परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त पंकज शिरसाट, वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे आणि इतर पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून तातडीने आग विझविली. रात्री उशीरापर्यंत कंपनीत मदतकार्य सुरू होते. कारखान्यात आणखी काही कामगार अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
- मन हेलावून टाकणारी परिस्थिती
- ज्या कारखान्यात अपघात झाला त्याला नेमक्या कोणकोणत्या परवानग्या आहेत. घटनास्थळी नेमके काय घडले, याची चौकशी केली जाणार आहे.
- कंपनीत स्फोट झाल्यानंतर तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तेथील परिस्थिती मन हेलावून टाकणारी होती.
- कंपनीत काम करणाऱ्या कामगारांची ओळख पटविणे आणि अजून यात कोणाचा मृत्यू झाला आहे का, याचा तपास सुरू असल्याचे परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.