पालघर : पालघर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदार यादीत राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक व गटनेते मकरंद पाटील ह्यांनी घोळ घालून सत्ताधाऱ्यांशी अर्थपूर्ण संबंध ठेवले आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका डॉ.श्वेता पाटील ह्या बैठकीला सतत गैरहजर राहत असल्याचा ठपका ठेऊन आज राष्ट्रवादीने ह्या दोघांची पक्षातून हकालपट्टी केली.
पालघर नागरपरिषदेवर सेनेची सत्ता असून सेनेचे १७ नगरसेवक, राष्ट्रवादी १०, काँग्रेस एक असे बलाबल होते. नगरसेवक मकरंद पाटील ह्यांना गटनेते पद आणि विरोधी पक्ष नेते पद पक्षाने बहाल केले होते.पाच वर्षाच्या कालावधीत त्यांनी सभेत आपल्या नगरसेवकांनी मांडलेले प्रश्न उचलून न धरता उलट सत्ताधाऱ्यांना मदत करणारी भूमिका बजावल्याचा ठपका जिल्हा सरचिटणीस अनिल गावड ह्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत ठेवला. त्यांनी सत्ताधाऱ्यांशी अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप ही त्यांच्यावर करण्यात आला. पालघर नगरपरिषदेच्या मतदार यादीत घोळ करण्यात मकरंद पाटील ह्यांचा हात असल्याचे समोर आल्या नंतर ह्या प्रकरणी त्यांनी तहसीलदारांची माफी मागीतल्याचा गौप्यस्फोट गावड ह्यांनी पत्रकार परिषदेत केला. नगरसेविका डॉ.पाटील ह्या नगरपरिषदेच्या सभांना जास्तीत जास्त गैरहजर कशा राहतील ह्याची काळजी घेत असल्याने त्यांचीही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रभारी गणेश नाईक, जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा ह्यांच्या आदेशाने राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टीची घोषणा ह्यावेळी करण्यात आली.जोडपे शिवसेनेत जाणारपाटील दाम्पत्य सध्या शिवसेनेच्या वाटेवर असून डॉ.श्वेता पाटील ह्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळावी ह्यासाठी मकरंद हे सेनेच्या वरिष्ठांशी संधान साधून आहेत. मात्र शिवसेनेत अनेक निष्ठावान, शिक्षित महिला पदाधिकारी असतांना त्यांना उमेदवारी देण्यास प्रचंड विरोध होत आहे.
मी आजपर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहिलो तसेच पालघर नगरपरिषदेमधील गैरव्यवहाराबद्दल बैठकांमध्ये विषय मांडले.तर डॉ.श्वेता ह्या प्रसूती दरम्यान बैठकीस उपस्थित नव्हत्या. मतदार यादीतील घोळाशी माझा संबंध नाही. - मकरंद पाटील,