अनिरुद्ध पाटीलडहाणू/बोर्डी : तालुक्याची किनारपट्टी आणि खाजण क्षेत्र जैवविविधतेने नटलेले असून येथे विविध देश-विदेशातील पक्ष्यांचा वावर आढळतो. वाढवण किना-यावर नुकतेच काळ्या डोक्याच्या खंड्याचे दर्शन पक्षी निरीक्षक भावेश बाबरे, प्रवीण बाबरे आणि शैलेश अंब्रे यांना झाले आहे. हा पक्षी काळशीर खंड्या नावानेही ओळखला जातो. धीवर पक्षीकुळातील दक्षिण आशिया, पूर्व आशिया आणि आग्नेश आशिया या भूप्रदेशात आढळणारी प्रजाती आहे. समुद्र किना-यालगत कांदळवनात खाडी-नदी-नाल्यांच्या काठावर एकट्याने राहणाºया या पक्ष्याचे दर्शन स्थानिक निरीक्षकांना झाले. खेकडे, मासे, सरडे, कीटक हे या पक्ष्यांचे खाद्य आहे. त्याची लांबी २८ ते ३० सें. मी. असून पाठीकडून गडद निळा रंग होता. पोटाकडून छातीचा भाग पांढरा आणि खालील भाग लालसर पिवळा असल्याचे ते म्हणाले. डोक्यावर मखमली काळी टोपी आणि गळ्यापासून मानेपर्यंत पांढरी पट्टी आणि त्याची चोच लाल रंगाची असते. नर आणि मादी दिसायला सारखेच असतात. त्याचा वावर दुर्मिळ असून आवाज पांढºया छातीच्या खंड्यापेक्षा तीव्र असल्याचे भावेश म्हणाला.एप्रिल, मे ते जुलै हा त्याचा प्रजनन काळ आहे. हे खाडी किंवा नदीच्या काठावरील तटाला लागून जमिनीत खोल बोगद्यासारखे घरटे तयार करतात. मादी एकावेळी ४ ते ५ अंडी देते. नर-मादी मिळून पिलांची देखभाल व संगोपन करतात. या पक्षांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी त्यांना सुरक्षित तसेच पोषक वातावरण देण्यासाठी उपाययोजना आखण्याची मागणी पक्षीप्रेमींनी केली आहे.>यापूर्वी येथे पाणथळ पक्ष्यांसह फ्लेमिंगो, राखी व सोन चिखल्या, रोहित, काळा बगळा, पांढरा अवाक, उलट चोचीचा तुतारी, रंगीत तुतारी, चातक, हॉर्नबील, नवरंग, निलपंख, पिवळ्या पायाची हिरोळी आदी पक्षी आढळले आहेत.>वाढवणपासून ते थेट सीमा भागातील समुद्रकिनाºयालगत गावच्या किनारी आणि खाजण भागात अनेक दुर्मिळ पक्षी दिसतात. नुकताच काळ्या डोक्याचा खंड्या दृष्टीस पडला.- भावेश बाबरे,पक्षी निरीक्षक, चिंचणी
वाढवण समुद्रकिनाऱ्यावर आढळला काळ्या डोक्याचा खंड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 1:02 AM