आशिष राणे
वसई - वसई विरार शहर महापालिका "एच" प्रभाग समिती अंतर्गत नवघर माणिकपूर शहरातील सुयोग नगर स्थित गॅलक्सी अपार्टमेंटच्या पदाधिकाऱ्यांनी मागील दोन दिवसापासून मोठ्याला झाडांची बेसुमार कत्तल सुरू असल्याची माहिती वृक्षप्रेमी नागरिकांनी शनिवारी रात्री उशिरा लोकमतला दिली आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार,नवघर माणिकपूर शहरातील एच प्रभाग स्थित चुळणे रोड या मुख्य रस्त्याला लागून असलेल्या गॅलक्सी अपार्टमेंट मध्ये मोठ्याला झाडांची बेसुमार कत्तल मागील दोन दिवसांपासून सुरू असून देखील महापालिका व पोलीस प्रशासन यांचे भरारी पथक काय पेट्रोलिंग करत होते असा प्रश्न आता वृक्षप्रेमीं नागरिकांना पडला आहे. सर्वत्र लॉकडाऊन व कोरोनाचे संक्रमण आणि विशेष म्हणजे सर्वत्र प्राणवायू (ऑक्सिजन) ची कमतरता असताना गॅलेक्सी सोसायटीला अचानक अडसर ठरणाऱ्या या मोठ्याला व जुन्या झाडांची मुळासकट कत्तल केल्याची गंभीर घटना शनिवारी रात्री जागरूक वृक्षप्रेमीं नागरिकामुळे उघडकीस आली आहे.
गतवर्षी पासून सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे त्यात यंदा देशभर कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची मोठी कमतरता जाणवत असताना एकीकडे दररोज शेकडो रुग्ण दगावत आहेत आणि इथे पर्यावरण संरक्षण व त्यास चालना म्हणून सरकार झाडे लावायला सांगत आहे आणि हा उपक्रम करण्याचे सोडून सोसायटीच्या वतीनं ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांचीच खुलेआम कत्तल केली जाते आहे हे महाभयंकर व हा मनुष्यवधच आहे
दरम्यान, सर्वत्र लॉकडाऊन व शनिवार -रविवार सुटटीचा फायदा घेत वसईत बेकायदेशीर बांधकाम व वृक्षतोड सर्रास सुरू आहे याबाबत पाठपुरावा केला जाईल अशी संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्र पर्यावरण संरक्षण विभागाचे अध्यक्ष समीर वर्तक यांनी लोकमत शी बोलताना दिली. या वृक्षतोडीची माहिती जागरूक नागरिकांनी लोकमत माध्यमाला देताच एच प्रभाग समितीचे सहा. आयुक्त मनाली शिंदे यांना विचारले असता त्यांनी या वृक्षतोड कत्तल प्रकरणी आता रात्र झाली आहे, दिवसा सांगायला हवं होत अशी नकारात्मक प्रतिक्रिया लोकमतशी बोलताना दिली
परिणामी या वृक्षतोड प्रकरणी संबधीत उपायुक्त तानाजी नरळे यांना सांगितले असता त्यांनी आपण वृक्ष प्राधिकरण उपायुक्त यांच्याशी बोला असे सांगितले. यावरून महापालिका प्रशासन किती गंभीर आहे हेच या उपरोधक प्रतिक्रियेवरून दिसून येते. त्यामुळे, पालिकेचे रखवालदारच शेतातील कुंपण खातात असे स्पष्ट दिसून येते.
या प्रकरणी आता एच प्रभाग समितीने गॅलेक्सी अपार्टमेंट ने वृक्ष प्राधिकरणाची लेखी परवानगी घेतली आहे का नाही याची योग्य ती चौकशी करून वृक्ष प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत गंभीरता दाखवून या घटनेस जबाबदार असणाऱ्या रहिवाशी संकुल व त्यातील पदाधिकाऱ्यावर वृक्षतोड प्रकरणी फौजदारी कारवाई करावी अशी मागणी वृक्ष प्रेमींकडून होत आहे.
झाड तोडणं हा कायदेशीर गुन्हा आहे तसं जर असेल तर फार गंभीर आहे,बाहेर परिस्थिती काय चालली आहे ,पालिका प्रशासन कोविड मध्ये व्यस्त असताना आता यांच्या मागे जायचे का ?मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देतो व उद्यान अधीक्षक मयूर साळवे यांना पाहणी करायला सांगितले आहे. -------------------------------------सतीश लोखंडे (भा प्र से)प्रभारी आयुक्त, वसई विरार महापालिकाआपण मला घटना व त्याचे फोटो पाठवा तसेच या रहिवासी संकुलासाठी वृक्षतोड प्रकरणी प्राधिकरण ने काही परवानगी दिली आहे का नाही हे तपासावे लागेल मी पहातेचारुशीला पंडितवृक्ष प्राधिकरण अधिकारी मुख्यालय---------------------------------रात्रीच्या वेळी झाडे तोडणे हे कायदेशीर रित्या चुकीचे आहे त्यांच्या जवळ परवानगी आहे का नाहीं यासाठी घटनास्थळी पोलीस टीम पाठवतो व माहिती घेतोभाऊसाहेब आहेरपोलीस निरीक्षक, माणिकपूर पोलीस स्टेशनझोन-2