पालघर : आॅनलाईन शिक्षण प्रणाली राबविण्याआधी आदिवासीबहुल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अँड्रॉइड मोबाईल, लॅपटॉप आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रथम उपलब्ध करून देण्याची मागणी श्रमजीवी संघटनेने केली आहे. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत पालघर, रायगड आणि नाशिक आदी जिल्ह्यांतील सर्व पंचायत समिती कार्यालयांसमोर सत्याग्रह करून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना गटविकास अधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले.लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी राज्य सरकारने आॅनलाईन शिक्षण प्रणाली अंमलात आणली आहे. या प्रणालीचा अभिनव सत्याग्रह करत श्रमजीवी संघटनेच्या युवकांनी समाचार घेतला आहे. हस्तिदंत मनोºयात बसून शिक्षणमंत्र्यांनी आॅनलाईन शिक्षणाचा घेतलेला निर्णय आणि आखलेले धोरण हे अत्यंत विद्वत्तापूर्ण असल्याचे श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी सांगितले.दुर्गम, ग्रामीण, आदिवासी भागात इंटरनेटची नेटवर्क सुविधा, प्रत्येक आदिवासी विद्यार्थ्यांना लॅपटॉप, स्मार्टफोन तात्काळ उपलब्ध करून द्यावा, ज्या दुर्गम भागात वीज नाही तेथे विजेची उपलब्धता निर्माण करून द्यावी, प्रत्येक आदिवासी व गरीब विद्यार्थ्याला इंटरनेट डेटा रिचार्जसाठी निधी द्यावा, वरील शैक्षणिक साहित्य व साधने उपलब्ध न झाल्यास ठाणे, पालघर, नाशिक व रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गटशिक्षण अधिकारी कार्यालयात शिक्षण देण्याची व्यवस्था करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित, संस्थापिका विद्युलता पंडित आणि अध्यक्ष रामभाऊ वारणा यांच्या मार्गदर्शनाखाली हा सत्याग्रह झाला.
ऑनलाइन शिक्षण प्रणालीआधी आदिवासी विद्यार्थ्यांना सुविधा द्या; श्रमजीवीचा सत्याग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 12:57 AM