सुनील घरत, लोकमत न्यूज नेटवर्क, पारोळ : वसईत कारखान्याला आग लागण्याचे प्रकार वाढत असून कामण येथे मिक्सर बनवणाऱ्या जेपान कारखान्याला आग लागली. या आगीत कारखान्यातील मिक्सर बनवण्याचे साहित्य जळून खाक झाल्याने या कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे. ही आग एवढी भीषण होती की, या परिसरात या आगीमुळे मोठ्या प्रमाणावर धुराचे लोळ पसरले होते. ही आग पहाटे चारच्या सुमारास लागली.
या आगीची माहिती मिळताच वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत ही आग एक तासानंतर आटोक्यात आणली.या आगीचे कारण समोर न आल्याचे कारखादाराने सांगितले. मात्र ही आज पहाटे कारखाना बंद असताना लागल्याने जीवितहानी मात्र टळली आहे.
वसई तालुक्यात कारखान्याला आगी लागण्याच्या घटना गतवर्षी मोठ्या प्रमाणात घडल्या होत्या. या नवीन वर्षातील ही आगीची पहिली घटना आहे. मात्र कारखान्याला वारंवार आगी लागत असल्याने महापालिकेने आपल्या हद्दीतील कारखान्यांची तपासणी करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिक करत आहेत.