हितेन नाईक
पालघर : डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथील मॉबलिंचिंग प्रकरणात तीन निरपराध प्रवाशांना पोलिसांच्या ताब्यात आणि जिवंत असतानाही जमावाने पोलिसांसमोरच ठार मारले. त्याप्रसंगी निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण राखण्यात पोलीस अधीक्षक गौरव सिंग अपयशी ठरल्यानेच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.केवळ संशय निर्माण झाल्याने गडचिंचले येथील प्रकार घडला. या प्रकरणातकायदा आणि सुव्यवस्था राखण्यात, तसेच पोलीस यंत्रणेचे ‘सुपर व्हिजन’ हाताळण्यात पोलीस अधीक्षकांना अपयश आल्याचे वास्तव समोर आले होते.
याच प्रकरणात सहा. पोलीस निरीक्षक आनंदराव काळे आणि पोलीस उपनिरीक्षक सुधीर कटारे यांच्यासह तीन पोलीस शिपायांना निलंबित करण्यात आल्याने पोलिसांच्या विरोधात निर्माण झालेले वातावरण काही वेळाने निवळेल, असा कयास पोलीस प्रशासनाकडून बांधला जात होता. परंतु १४ एप्रिल रोजी डॉ. विश्वास वळवी यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्यानंतरही जिल्ह्यात सुरू असलेल्या अफवांवर नियंत्रण आणण्यात पोलीस अधीक्षक सिंग यांना अपयश आले. त्यानंतर १६ एप्रिल रोजी तिघांची निर्घृण हत्या पोलिसांच्या ताब्यात असताना झाल्याचे पडसाद संपूर्ण देशात उमटले होते.
या प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तीन लोकांना वाचवण्याचे व जमावावर नियंत्रण आणण्यात उपस्थित पोलिसांसह पोलीस अधीक्षकांचे ‘सुपर व्हिजन स्लॅग’ झाल्याचे दिसल्याची चर्चा खुद्द पोलीस खात्यातच दबक्या आवाजात सुरू होती.घटनेच्या २० दिवसांनंतर गुरुवारी (७ मे) गृहमंत्र्यांनी गडचिंचले येथे भेट देत लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अँटीचेंबरमध्ये खा. राजेंद्र गावित, आ. श्रीनिवास वनगा, राजेश पाटील, सुनील भुसारा आदींशी गृहराज्यमंत्री देशमुख यांनी चर्चा केली. त्यानंतर लोकप्रतिनिधींनी पोलीस अधीक्षकांच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केल्याचा अंदाज आहे. यामुळेच गृहमंत्र्यांनी पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. यापुढे पालघरचा कार्यभार विक्रांत देशमुख किंवा विजयकांत सागर यांच्याकडे सुपूर्द केला जाणार आहे.जिल्ह्यात कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्नजिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार परिषदेत पत्रकारांनी गृहमंत्र्यांना धारेवर धरले. अफवांमुळे जिल्ह्यात लागोपाठ दोन वेळा जमावाने हल्ला केल्याच्या घटना घडल्या. या दोन्ही घटनांनंतर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. तेव्हाच योग्य ते नियोजन न केल्याने वसई तालुक्यातील निर्मळ येथे एका परप्रांतीयाच्या घरावर ४० ते ५० लोकांच्या जमावाने हल्ला केला. म्हणजेच लोकांमध्ये कायद्याची भीतीच नाही, पोलिसांचे नियंत्रण नसल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली होती.गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गृह विभागाचे हे अपयश असल्याची टीका पत्रकार परिषदेत करण्यात आली होती. यावर राज्य शासन योग्य निर्णय घेईल, असे गृहमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले होते. त्यानंतर पालघरवरून संध्याकाळी घरी गेल्यानंतर गृहमंत्र्यांनी पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवीत असल्याची घोषणा केली.