हितेंन नाईक
पालघर : शासनाने जाहीर केलेल्या मच्छिमारी बंदी आदेश झुगारून पालघर व ठाणे जिल्ह्यातील वसई व उत्तन येथील काही मच्छीमार आपल्या बोटी समुद्रात घेऊन मासेमारी करीत असल्याच्या सहकारी संस्थांच्या तक्रारी नंतर त्यांच्यावर कडक कारवाईचे आदेश मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त दिनेश पाटील ह्यांनी आपल्या परवाना अधिकाऱ्यांना दिले आहेत.
राज्य शासनाने सागरी मासेमारी अधिनियम १९८१ अन्वये १ जून ते ३१ जुलै असा ६१ दिवसाचा मासेमारी बंदीचा कालावधी घोषित केला असून ह्या दरम्यान मासेमारी साठी समुद्रात जाणाऱ्या मच्छीमारांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. अशी अवैध मच्छिमारी दरम्यान जीवित व वित्तहानी ची कुठलीही घटना घडल्यास शासन पातळीवरून त्यांना कुठलीही मदत अथवा योजनेचा लाभ मिळणार नाही असे सक्त आदेश परिपत्रकाद्वारे मत्स्यव्यवसाय विभागाच्या सचिवांकडून देण्यात आलेले आहेत. मात्र या आदेशाला झुगारून पालघर व ठाणे जिल्ह्यातील काही मच्छीमार बोटी समुद्रात मासेमारीला गेल्याच्या तक्रारी सहकारी संस्थांनी मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त दिनेश पाटील यांच्याकडे केल्या आहेत.
पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत पालघर व ठाणे जिल्ह्यासह मुंबई मधील काही भागात बंदी कालावधी दरम्यान छुप्या पद्धतीने केल्या जाणाºया मासेमारी विरोधात मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजन मेहेर सह उपस्थित अन्य पदाधिकाऱ्यांनी जोरदार पवित्रा घेऊन कडक कारवाईची मागणी केली होती. ह्यावेळी सातपाटी मधील दोन्ही सहकारी संस्थांनी मत्स्यव्यवसाय आयुक्तांना पत्र लिहून १ जून पासून कुठल्याही बंदरात मासे उतरविले गेल्यास ते जप्त करून त्या बोटीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुंबई आदी बंदरात वर्षभरासाठी मासेमारी साठी आलेल्या अनेक पर्ससीन नेटधारक बोटी, ट्रॉेलर्स ३० मे दरम्यान आपल्या मूळ गावी जाण्याच्या बहाण्याने समुद्रात १० ते १५ दिवस मासेमारी करून नंतर आपल्या मूळ गावात पोचत होते. ह्यावेळी समुद्रात मासेमारी बंद असल्याचा फायदा उचलून हजारो टन मासे पकडून नेत असतात. सध्या माशांनी समुद्रात टाकलेल्या अंड्यातून जन्माला आलेल्या पापलेट, घोळ, सुरमई, बोंबील आदी माश्यांच्या पिल्लांची मोठ्या प्रमाणात कत्तल ह्यावेळी केली जात आहे. त्यामुळे भविष्यात पापलेट, घोळ, दाढा आदी माशांची आवक घटणार असून त्याचा फटका परंपरागत मच्छीमाराना बसून त्याच्या डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर वाढणार आहे.
दुष्काळात तेरावा महिनापर्ससीन नेटचा आणि लिड बल्बचा वापर करुन होणाºया बेसुमार मासेमारीमुळे आधिच मच्छिची संख्या घटली आहे. त्यात मच्छिच्या विणीच्या काळात या बोटी त्यांच्या पिलांची अशा मासेमारीने कत्तल करु लागल्यास समुद्रात मच्छिचा दुष्काळ निर्माण होण्याची दाट शक्यता असते. हे लक्षात घेऊन मत्स्य विभागाने अशा नौकांनवर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे. ते न झाल्यास मच्छिमारांन समोरील अडचणीत वाढ घडून येईल.
जिल्ह्यातील सर्व परवाना अधिकारी आणि विविध केंद्रावरील सुरक्षा रक्षकांना बोटीवर लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. - दिनेश पाटील, सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग.