जव्हार : वनगा परिवार तोडण्याचे पाप श्रीनिवासला उमेदवारी देऊन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्याचे फळ त्यांना जनता भोगायला लावेल, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथील प्रचारसभेत केली.शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी आणि त्यांच्या काळातल्या शिवसेनेने कधीही कुणाच्या पाठीत वार केला नाही. परंतु सध्याच्या शिवसेनेकडून मात्र ते काम जोरात सुरू आहे. कुणाच्याही अश्रूंचे राजकीय भांडवल करू नये हा सभ्यतेचा संकेत आहे. परंतु तोही सध्या शिवसेनेकडून पाळला जात नाही. त्यामुळे जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही, असे ते म्हणाले.आम्ही श्रीनिवासला उमेदवारी देणारच होतो. त्यासाठी शिवसेनेने पाठिंबा देण्याचे मान्यही केले होते. असे असताना अचानक त्यांनी श्रीनिवासची दिशाभूल केली. हा प्रकार वनगांनी आदिवासींच्या कल्याणासाठी जो संघर्ष केला त्याचा अवमान करणारा आहे, असेही ते म्हणाले.गेल्या १५ वर्षांत आदिवासींना जेवढे वनपट्टे दिले गेले नाहीत, तेवढे ते आम्ही साडेतीन वर्षांत दिले. त्यासोबत त्यांना शासकीय योजनांचे लाभही मिळवून दिले, असे ते म्हणाले. आपल्या सत्ताकाळात पालघर जिल्ह्यातील कुपोषण घटले. महाराष्टÑ हागणदारीमुक्त झाला, असा दावा त्यांनी केला.
वनगा परिवार तोडण्याचे पाप उद्धवांच्या माथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:02 AM