विरार : विजयवल्लभ दुर्घटनेत आगाशी येथे राहणाऱ्या सुवर्णा पितळे यांचाही मृत्यू झाला आहे. सुवर्णा या घरचा आधार होत्या. त्यांच्या जाण्याने त्यांच्यावर अवलंबून असलेल्या सहा जणांच्या डोक्यावरचे छत्र हरपले आहे.
सुवर्णा पितळ यांच्या मागे त्यांचे दोन दीर रमेश व रंजन, दोन नणंदा सुनंदा व कुसुम आणि दोन मुले असा परिवार आहे, अशी माहिती त्यांचे पुतणे संदीप पितळे यांनी दिली. पतीच्या निधनानंतर कुटुंबाचा चरितार्थ सुवर्णा पितळे यांच्यावरच चालत होता. विशेष म्हणजे त्यांचे दीर आणि नणंदा यांचे वय साठी पार आहे. इमिटेशन ज्वेलरीच्या कामातून हे सर्व जण आपला उदरनिर्वाह करत होते.
गुरुवारी सुवर्णा यांना खोकला होता म्हणून विजयवल्लभ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांची कोविड टेस्ट निगेटिव्ह आली होती. परंतु लक्षणे कोविडचीच असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते, अशी माहितीही संदीप पितळे यांनी दिली.
दरम्यान, सकाळी पाच वाजता संदीप पितळे यांना त्यांच्या मित्राने रुग्णालयाला आग लागल्याची माहिती दिल्याचे ते सांगतात. विरार येथील या दुर्घटनेत एकूण १५ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील एसीच्या काॅम्प्रेसरचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडली होती.