- लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : गेल्या तीन महिन्यांपूर्वी पालघर येथील लोकमान्य नगरमध्ये राहणाऱ्या व पोलिसांच्या ताब्यात असताना संशयास्पदरित्या मृत्यू पावलेल्या आशिष काटेला याच्या मृत्यूची चौकशी व्हावी यासाठी त्याचे नातेवाईक उपोषणाला बसले आहेत.आशिषने आपला मित्र रुपेश जाधव व त्याची पे्रयसी यांना लग्न करण्यासाठी पळून जाण्यात मदत केल्याबद्दल पोलिसांनी त्याच्या नातेवाइकांना न सांगताच त्याला अटक केली होती. वास्तविक त्याच्या अटकेची नियमांप्रमाणे त्याच्या नातेवाईकांना पूर्वकल्पना देणे आवश्यक असताना ती दिली गेली नाही. पंचनामाही केला नाही. त्याची मुक्तता केल्याची कल्पनाही नातेवाईकांना दिली नाही. किंवा त्यांच्या स्वाधीनही त्याला केले नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह नवली फाटकजवळील रेल्वे ट्रॅकनजिक आढळून आला होता. गेले तीन महिने पाठपुरावा करूनही पालघर पोलिसांनी या संशयास्पद मृत्यूबाबत कोणताही तपास केलेला नाही. असा आरोप करून हे नातेवाईक पोलीसठाण्यासमोर उपोषणाला बसले आहेत. यामधील गुन्हेगारांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे व मृत आशिषला अटक केल्याच्या दिवसाचे पोलीस स्टेशनमधील सीसीफुटेज मिळाले म्हणून त्याची आई निर्मला दीपक काटेला व काकी वर्षा विलास काटेला या पालघर पोलीस स्टेशनसमोर आमरण उपोषणास बसल्या आहेत. या केसशी मृत आशिष काटेला याचा कोणताही संबंध नसून त्याला न्याय मिळवा यासाठी हा लढा उभारल्याचे अशिषच्या आई व काकींनी लोकमतला सांगितले आहे.मार्चमध्ये आशिष याने आपला मित्र व त्याची प्रेयसी यांना पळून जाऊन लग्न करण्यासाठी मदत केली म्हणून बोईसर येथे नेऊन सोडले हे कळताच लोकमान्य नगर येथील मुलीच्या नातेवाईकांनी आशिष याला पकडून पोलिसांत दिले मात्र त्याला पकडल्या बाबतची माहिती त्याच्या नातेवाइकांना दिली नाही.पोलीस स्टेशनला आणल्यानंतर पोलिसांनी त्याला मारहाण केली व त्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला संपूर्ण रात्र त्याला पोलीस स्थानकात ठेवले गेले यादरम्यान अशिषच्या वडीलांना हे समजताच त्यांनी त्याची भेट घेण्यासाठी पोलीस स्टेशन गाठले. मात्र पोलिसांनी त्यांना आशिषला भेटू दिले नाही उलट त्यांना तेथून हाकलण्यात आले. दरम्यान त्याला पोलिसांनी सीमकार्ड घेण्यासाठी घरीही पाठवले होते, असे त्याच्या वडीलांनी सांगितले.आशिष दुसऱ्या दिवशी रेल्वे ट्रॅकजवळ मृतावस्थेत नवली येथे आढळला. हे सकाळी घडले व त्याच्या नातेवाइकांना हि बाब दुपारी २.३० च्या सुमारास कळली. लागलीच नातेवाइकांनी रेल्वे स्थानक गाठले तोवर त्याचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठविला होता तदनंतर आशिषच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेत तो पोलीस स्टेशन पालघर येथे नेला व या घडलेल्या प्रकारची गंभीर दखल घ्या नाहीतर आम्ही त्याचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असे त्याच्या नातेवाइकांनी सांगताच पोलिसांनी आम्ही योग्य तो तपास करून दोषी असलेल्यांवर कारवाई करू असे आश्वासन दिले. मात्र तीन महिने उलटूनही पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक पालघर यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही आजवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. काय दडलंय या सीसीटीव्ही फुटेजमध्ये?मार्चमध्ये आशिषला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची त्याला आणल्याची वेळ व सोडल्याची वेळ या सीसीटीव्हीत चित्रीत झाली आहे. त्याच्या नातेवाइकांनी या फूटेजची मागणी केली असता पोलिसांनी देतो असे सांगून ३ महिन्यांतरही ते दिले नाही.आशिषला पालघर पोलीस स्टेशनमधून सोडल्याची वेळ सकाळी ७ वाजून १९ मिनिटांची आहे व अशिषचा रेल्वे अपघात ७ वाजून २३ मिनिटांनी झाल्याचे दाखविले आहे. पोलीस ठाणे ते घटनास्थळ हे अंतर जाण्यासाठी १० मिनीटे लागतात असे असताना तो ३ मिनिटात पोहचून जीव कसा देऊ शकतो. यामागे काही तरी दडले आहे व पोलीस खोटे बोलून आमची दिशाभूल करत आहेत असा त्याच्या नातेवाईकांचा आरोप आहे.एका मित्राला मदत करण्यासाठी अशिषला आपला जीव गमवावा लागला मात्र ज्याच्यामुळे जीव गेला ते मोकाटच आहेत.कारवाई करण्यात पोलिसांनी दिरंगाई केली व चित्रिफतीत सत्य दडले आहे म्हणून पोलीस ते देत नाहीत मात्र माङया मुलाला न्याय मिळायलाच हवा. -दीपक काटेला, अशिषचे वडील