वसई : वसई - विरार शहर महानगरपालिकेने तयार केलेले फेरीवाला धोरण बुधवारी संपन्न झालेल्या महासभेतच नियोजनशून्य असल्याचा आरोप करीत फेटाळण्यात आले आहे. मुळातच हे धोरण करताना पालिका प्रशासनाने कोणालाही विश्वासात घेतलेलं नाही, तसेच हे धोरण पालिका व फेरीवाले यांच्या बाजूनं सकारात्मक नसल्याचा आरोप सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांनी केला आहे. या फेरीवाला धोरणातील तरतुदींवर सर्वच नगरसेवकांनी जोरदार टीका केली. त्यामुळे या धोरणाला तूर्तास स्थगिती दिली असून आता हे धोरण नव्याने तयार केले जाणार आहे.वसई-विरार शहर दिवसेंदिवस अनिधकृत फेरीवाल्यांच्या विळख्यात सापडले जात असून दिवसेंदिवस फेरीवाल्यांची संख्या ही वाढत आहे. त्यामुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी, अतिक्र मण या समस्या वाढल्या आहेत. फेरीवाल्यांच्या वाढत्या संख्येमुळे शहराचे नियोजनच कोलमडले आहे. यासाठी केंद्र शासनाने दीनदयाळ अंत्योदय योजना, नागरी उपजीविका अभियानांतर्गत फेरीवाल्यांच्या समस्या सोडवून त्यांचा विकास करण्यासाठी २०१४ मध्ये फेरीवाला धोरण तयार करण्याचे निर्देश दिले होते.>स्थायीने मंजुरी दिली पण धोरण शून्यपालिकेच्या स्थायी समितीने २०१५ मध्ये या धोरणासाठी मंजुरी दिली. मात्र त्यानंतरही हे फेरीवाला धोरण तयार झाले नाही, अखेर पाच वर्षांनी पालिकेने हे धोरण तयार केले आणि अचानकपणे बुधवारी झालेल्या महासभेत सभागृहासमोर मंजुरीसाठी ठेवले. धोरणच तकलादू असल्याने त्याला सर्वच पक्षाच्या सदस्यांनी जोरदार विरोध केला. हे धोरण तयार करताना प्रशासनाने कोणालाही विश्वासात घेतले नसल्याचे सांगत प्रभाग समिती सभापती, स्थानिक नगरसेवक यांनाही काहीही विचारले नसल्याचे नगरसेवक पंकज ठाकूर यांनी सांगितले.याबाबत माजी स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी यांनी पालिका प्रशासनावर सडकून टीका केली. फेरीवाल्यांना उपजीविकेचे साधन मिळायला हवे, मात्र नियोजन नसलेले हे धोरण असल्याचे ते म्हणाले. शहरात जागोजागी बेकायदा फेरीवाल्यांचा गराडा पडला आहे. त्याच ठिकाणी फेरीवाला क्षेत्र कसे काय घोषित केले जाऊ शकते, असा गंभीर सवाल त्यांनी केला.>जुन्या पालिकेसमोरच फेरीवाल्यांचे अतिक्र मण !जुन्या पालिकेसमोर बाजार बंद करण्यात आला, मात्र पालिकेच्या मुख्यालयाच्या परिसरातच फेरीवाल्यांनी अतिक्र मण करून तो गिळंकृत केला असल्याचे चित्र आहे,तर ज्या रस्त्यांवरून फेरीवाले हटवा अशी मागणी केली जात होती, तिथेच फेरीवाला क्षेत्र टाकले असेही त्यांनी सांगितले.>धोरणास स्थगिती देण्याची अजीव पाटील यांची मागणीपालिकेतील विद्यमान व हुशार नगरसेवक आजव पाटील यांनीही या धोरणावर जोरजार टीका करताना ज्या ठिकाणी फेरीवाला क्षेत्र दाखवले तेथे रस्ताच नसल्याचे सांगितले. तसेच या फेरीवाला धोरणाला तूर्तास स्थगिती देण्याची मागणी केली आहे.>धोरण नियोजनशून्यचमहापालिकेतील सत्ताधारी बविआ आणि इतर सेना - भाजपचे नगरसेवक यांनी प्रशासनाने एवढे मोठे धोरण परस्पर कसे ठरवले, असा सज्जड सवाल आयुक्तांना केला. तसेच रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला क्षेत्र ठेवल्याबद्दल जोरदार आक्षेप घेतला. इतर सदस्यांनीही यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.>आयुक्तांनी दिली स्थगितीसत्ताधारी तसेच विरोधी पक्षांनी नियोजनशून्य धोरण असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आयुक्तांनी या धोरणाला तूर्तास स्थगिती दिली आणि सर्वव्यापी असे धोरण नव्याने तयार करून सर्व सूचनांचा विचार करून ते सादर करणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.>फेरीवाला धोरण तयार करताना सर्व गोष्टींचा विचार, सर्वेक्षण, आढावा घेतला जाईल. शहर स्वच्छ झालेच पाहिजे ही भूमिका महत्त्वाची आहे, तेव्हा सर्वांना विचारात घेऊन हे धोरण करावे, अशा पूर्वीही सूचना होत्या. यावेळेस सभागृहातील सदस्यांचा विरोध पाहून सर्वांच्या सूचना विचारात घेऊन पुन्हा नव्याने हे धोरण तयार केले जाईल.-बी. जी. पवार, महापालिका आयुक्त,वसई विरार महापालिका, मुख्यालय
फेरीवाला धोरणाला तूर्तास स्थगिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 11:58 PM