वसंत भोईर
वाडा : वाडा हा शेतीप्रधान तालुका आहे. या तालुक्यात पावसाळ्यात तांदळाचे उत्पादन घेतले जाते. त्यानंतर कडधान्याचे उत्पादन घेतले जाते. आता शेतीकडे बघण्याचा तरूणांचा कल बदलत असून उच्चशिक्षित तरूणही शेतीकडे वळत असल्याचे दिसते आहे. तालुक्यातील आंबिस्ते येथील उच्चशिक्षित यतीश सावंत या तरूणाने पपई तसेच केळीची शेती केली असून ती यशस्वी झाली आहे. या शेतीबरोबरोच त्याने गोट फार्मही उभारला असून यातून तो लाखोंचे उत्पन्न घेत आहे.
वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. वाडा कोलम हे भाताचे वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. याबरोबरच फळशेती, फुलशेती, मत्स्यशेती, कडधान्ये आदी पिकेही येथे घेतली जातात. युवावर्ग शेतीकडे फारसा फिरकत नसतानाही तालुक्यातील आंबिस्ते येथील सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या उच्चशिक्षित तरूणाने नोकरी न करता शेती सुरू केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी शेती केली असून ती आता चांगलीच बहरली आहे.यतीश यांनी आपल्या दीड एकर जागेत पपई शेती केली असून चारच महिन्यात पपईचे भरघोस पीक आल्याचे दिसते आहे. आॅगस्ट महिन्यात शेतीची नांगरणी करून वाफे बनवून त्यावर शेणखत टाकून मल्चिंग पेपर टाकून तैवान या जातीच्या पपईच्या रोपांची लागवड केली. चारच महिन्यात ही रोपे पाच ते सहा फूट वाढली असून एका रोपाला २२ ते २३ च्या आसपास पपई आले आहेत. एका रोपाला साधारणपणे ५० किलोपर्यंत पपई येतात, असे यतीश यांनी सांगितले. दीड एकरात साधारणपणे पंधराशे रोपांची लागवड केली आहे. ठिबक सिंचनाद्वारे त्यांना पाणी, खते दिली जात आहेत. या दीड एकरासाठी एक ते सव्वा लाखांचा खर्च झाला असून हे पीक दोन वर्षांपर्यंत येईल. त्यामुळे या दोन वर्षांमध्ये चांगले उत्पन्न मिळणार आहे.पपई, केळी या पिकांत रोगांचे प्रमाण कमी असल्याने ही शेती चांगल्या प्रकारे बहरली आहे. याचबरोबर यतीश याने दीड एकरात केळी शेतीही केली असून जी ९ या वाणाच्या जातीची त्याने लागवड केली आहे. केळीचे पीकही बहरले असून सुमारे ११ महिन्यात हे पीक येण्यास सुरवात होईल. आणि आठ ते दहा वर्षे केळीचे पीक घेता येईल, असे यतीशचे म्हणणे आहे. ही दोन्हीही पिके चांगली बहरली असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही शेती केल्याने कमी मजुरांत ही शेती तो करतो आहे. शेती करताना अनेकांचे मार्गदर्शन मिळत असल्याचे यतीशने सांगितले. पपई, केळी लागवडीबरोबरच गोट फार्म असून त्यातूनही चांगले उत्पन्न मिळते.शेतीची आवड आणि करण्याची जिद्द असेल तर कोणताही तरूण मागे राहू शकत नाही. आधुनिक शेती केली तर नक्कीच फायदा होतो. तरूणांनी शेतीकडे वळले पाहिजे.- यतीश सावंत, युवा शेतकरी