- अनिरुद्ध पाटील, डहाणू/बोर्डी
मान्सून आगमनच्या संकेताने बळीराजा सुखावला असून, भात पेरणीपूर्व मशागतीची कामेही अंतिम टप्यात आली आहेत. दरम्यान शेतकऱ्यांना अनुदानाने मिळणाऱ्या बियाणात पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे संकरीत बियाणे खरेदीकडे कल वाढला असून बियाणे विकत घेतल्यानंतर आणि पेरणीपूर्वी जागरुकता दाखविल्यास सदोष बियाणाद्वारे होणाऱ्या फसवणुकीचा धोका टाळता येईल असे तज्ञांचे म्हणणे आहे. कृषी हवामानानुसार महाराष्ट्राचे नऊ विभाग पडतात. त्यापैकी कोकण विभागामध्ये तीन विभाग येतात. कोकणाचे शेती व पीकपद्धती ठरविण्यामध्ये समुद्रकिनाऱ्यापासूनचे अंतरसुद्धा महत्वाचे आहे. त्यानुसार किनाऱ्यापासून १५ ते २० किमी खलाटी, २० ते ६० किमी वलाटी आणि घाटमाथा असे तीन प्रकार आहेत. डहाणू तालुक्याला ३५ किमी लांबीची समुद्रकिनारपट्टी लाभली असून, तालुक्याचा समावेश प्रामुख्याने खलाटी आणि वलाटी क्षेत्रात होतो. तालुक्यात खरीप हंगामात १५००० हेक्टर क्षेत्रावर भात शेती केली जाते. त्यामध्ये हळवे २५५४, निमगरवे ९९०६ आणि गरवे २५४० हेक्टर असे लागवडीचे प्रमाण आहे. डहाणू तालुका पंचायत समितिअंतर्गत कृषी विभागामार्फत ५० टक्के अनुदानावर कर्जत ३ या बियाण्यांचे वाटप केले जाते. अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने किमती अधिक असूनही स्थानिक शेतकरी जादा उत्पादन देणाऱ्या संकरीत भात बियाण्यांकडे वळला आहे. त्याचा प्रतीकिलो दर ८५ ते ११० आहे.भात बियाणे खरेदी केल्यानंतर तसेच पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेतल्यास फसवणुकीचा धोका टाळता येईल असे त्यासाठी शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केल्यानंतर, पेरणीपूर्व तसेच पीक तयार झाल्यानंतर योग्य व अभ्यासपूर्ण निरीक्षण व नोंदी ठेवणे गरजेचे आहे. बियाण्यांची पिशवी टॅगच्या विरूद्ध दिशेने फोडावी, बियाण्यांचा नमूना पिशवीत राखून ठेवावा, बिल जपून ठेवावे. ५ ते ७ दिवसात बियाणे उगवते. मात्र उगवण क्षमता कमी आढळल्यास खरेदी केलेल्या लॉटच्या बियाण्याच्या नमुन्यांची पंचायत समितीच्या अधिकाऱ्यास तपासणी करण्यास सांगावे. बियाणे कायद्याच्या कलम १९ नुसार कारवाई होवू शकते. यासाठी तालुकास्तरावर बियाणे तक्र ार समिती गठीत केलेली असते.