शशिकांत ठाकूर
कासा : डहाणू तालुक्यात विविध भागात उन्हाळ्यात भातशेती व भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र लॉकडाऊनच्या निर्बंधामुळे शेतीच्या कामासाठी मजूर मिळत नाहीत आणि बाजारपेठा बंद असल्याने माल विकायचा कुठे? विकलाच तर त्याला चांगला भावही मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
सूर्या कालव्याच्या पाण्यामुळे तालुक्यातील कासा, वाणगाव आदी भागातील गावात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. भातशेतीबरोबर शेतकरी भाजीपाला लागवडही करतात, मात्र १६ एप्रिलपासून कडक निर्बंध लावले आहेत. बाजारपेठा बंद असून संचारबंदी आहे. ग्रामीण भागातही रुग्णसंख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे खेड्यापाड्यातील शेतीच्या कामासाठी मजूर मिळत नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते. येत्या आठवड्याभरात भात कापणीच्या कामाला सुरुवात होणार आहे, मात्र मजूरच नाही. वाणगाव भागात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची लागवड तेथील शेतकरी करतात. तसेच बऱ्याच गावांमध्ये मिरचीसारख्या पिकांची लागवडही केली जाते, मात्र सध्या बाजारपेठा बंद असल्याने भाजीपाला व पिकाची विक्री करायची कुठे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
भाजीपाला खरेदी करणारे दलाल येत नाहीत तसेच काही ठिकाणी सकाळी भाजीपाल्याची दुकाने उघडतात, मात्र भीतीमुळे खरेदीसाठी ग्राहक बाहेर जास्त पडत नाहीत. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी भाजीपाला, मिरची यासारखी पिके शेतातच पडून आहेत. या भाजीपाल्यासाठी महागडी बियाणे, खते यांचा वापर करावा लागतो. मात्र, आता हा खर्च कसा काढायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. नफा तर नाही, पण केलेला खर्चही निघणार नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दुसरीकडे, कासा भागात कालव्याच्या पाण्यावर तर सायवन भागात कालव्याचे पाणी नसल्याने नदी, विहिरी व बोअरच्या पाण्यावर आदिवासी उन्हाळ्यात वांगी, मिरची, टोमॅटो, भोपळा, दुधी, भेंडी, गवार, काकडी यासारख्या भाजीपालाची लागवड करतात व परिसरातील आठवडा बाजारात त्याची विक्री करतात, मात्र कोरोनामुळे आठवडा बाजार बंद आहेत.
लॉकडाऊनमुळे बाजारपेठा व आठवडा बाजार बंद असल्याने भाजीपाला विकायचा कुठे? असा प्रश्न निर्माण झाला असून केलेला खर्च वाया जाणार आहे. - सुनील मेरे, शेतकरी