पालघर : वाडा तालुक्यातील हमरापूर ग्रामपंचायतअंतर्गत रॅशनल इंजिनीअरिंग कंपनीने बेकायदेशीररीत्या अनधिकृत बांधकामे केली असून त्याविरोधात अनेकदा तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ स्थानिकांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.रॅशनल इंजिनीअरिंग ही कंपनी सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली असून या कंपनीने नगररचना विभागाकडून नकाशा मंजूर करण्याआधीच वाढीव बांधकाम केल्याचा गोप्यस्फोट तक्रारदारांनी मिळविलेल्या माहितीमुळे झाला आहे. पनीच्या पहिल्या तसेच दुसऱ्या मजल्याचे बांधकाम करताना काही ग्रा.पं. सदस्यांना हाताशी धरून त्या बांधकामाची कर आकारणीही करून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सध्या कंपनी तळ मजला ते चार मजले अशा नियमबाह्य पद्धतीने उभी असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. कंपनीच्या या अनधिकृत बांधकामावर कारवाई करून ते बांधकाम पाडण्यात यावे, यासाठी दोन वर्षांपासून ग्रामपंचायत, तहसीलदार, उपविभागीय महसूल अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करूनही अजूनही त्या अनधिकृत बांधकामावर कारवाई होत नाही. अनधिकृत बांधकामावर कारवाई होऊ नये, यासाठी राजकीय दडपणे येत असल्याचेही तक्रारदारांचे म्हणणे आहे. वाडा तहसीलदार कार्यालयाकडून नगररचना विभागाची माहिती तपासण्यापोटी दोन वर्षांचा कालावधी निघून गेला असून ग्रामपंचायतीनेही मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ प्रमाणे वाढीव बांधकामासंदर्भात नोटीस बजावली आहे. आता ती देखील शांत बसली असून बेकायदेशीरपणे अनधिकृत बांधकाम उभारले असतानाही त्यावर कारवाई करण्यात वाडा महसूल विभाग आणि ग्रा.पं. चालढकल करीत असल्याने तक्रारदारांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनाच साकडे घातले आहे. (वार्ताहर)
अनधिकृत बांधकामांविरोधात उपोषण
By admin | Published: October 06, 2015 12:06 AM