मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने रविवारी आयोजित केलेल्या सायक्लोथॉन मध्ये पालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका सायकलपटूंना बसला एक सायकल पटू तर बसच्या खाली जाता जाता वाचला. त्यामुळे टीका होत आहे.
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत महापालिकेने रविवारी किल्ला सायक्लोथॉनचे आयोजन केले होते. त्यात सुमारे ६०० इच्छूक सहभागी झाले होते असे पालिकेने म्हटले आहे. ह्या स्पर्धेत १८ ते ६९ वयोगटातील सायकल चालवणाऱ्या स्पर्धकांना विविध गट करून १० हजार ते ५१ हजार रुपयांची अनेक रोख पारितोषिके ठेवली होती.
महापालिका आयुक्त संजय काटकर यांच्यसह पालिकेचे अनेक अधिकारी सायक्लोथॉन साठी जमले होते. भाईंदरच्या सुभाषचंद्र बोस मैदान ते चौक येथील धारावी किल्ला व त्यातून परत असा सायकल चा मार्ग ठेवला होता.
परंतु मुर्धा ते डोंगरी दरम्यानचा रस्ता अर्धवट, उंच सखल व अनेक भागात अरुंद असून या ठिकाणी वाहनांची मोठी वर्दळ असते. रविवारी तर मासळी वाहतूक, पर्यटक आदींच्या गाड्यां सह पालिकेच्या परिवहन बस, रिक्षा, अवजड वाहने, दुचाकी, कार आदी भरधाव चालवल्या जातात. त्यामुळे सायकल साठी आवश्यक उपाययोजना पालिकेने केल्या पाहिजे होत्या. वाहतूक पोलिसांसह ट्रॅफिक वॉर्डन, स्वयंसेवक आदींची पुरेशी नियुक्ती केली पाहिजे होती.
परंतु पालीकेच्या ढिसाळ नियोजनामुळे अनेक सायकलपटूना सायकल चालवण्यात अडचण येत होती. बक्षिसाची मोठी रक्कम तसेच पहिला क्रमांक मिळावा म्हणून सायकलपटू उत्साहित होते. त्यातूनच मुर्धा येथे पालिकेच्या बस ला आदळून एका सायकलपटूला अपघात झाला. सायकल सह तो खाली पडला. सुदैवाने तो बसच्या मागील चाकाखाली आला नाही म्हणून बचावला.