वसई : विद्यावर्धिनी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयात ‘व्ही.सी.ई.टी. हॅकेथॉन २०१९’ या सलग ३० तास चाललेल्या संगणक कोडिंग स्पर्धेत फादर कॉन्सिसाव रॉड्रिक्स अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघाने २५ हजार रुपयांचे पहिले पारितोषिक पटकाविले. दुसरे पारितोषिक डी.जे. सांघवी अभियांत्रिकी महाविद्यालय (१५ हजार) तर तिसरे पारितोषिक डी.जे. सांघवीच्या (१० हजार) विद्यार्थी संघाला मिळाले. उत्तेजनार्थ पारितोषिकाचा मान विद्यावर्धिनी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या दोन संघांनी मिळवला. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ‘लोकमत’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक होते.२७ आणि २८ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत १७ महाविद्यालयातील १४० विद्यार्थ्यांच्या एकूण ४० संघांनी सहभाग नोंदवला. १६ परिक्षकांनी तीन फेऱ्यांत केलेल्या परिक्षणाअंती १० संघ अंतिम फेरीसाठी निवडण्यात आले आणि त्यातून पुढे ३ विजेते संघ निवडण्यात आले. विद्यावर्धिनी संस्थेच्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे ही स्पर्धा घेण्यात आली. याचे उद्घाटन लक्ष्मण महेशकर (टेक्नॉलॉजी मॅनेजर, कॉमन एरियाज्, एल.एल.सी.) यांच्या हस्ते करण्यात आले. सामाजिक किंवा उद्योगांसाठी वास्तववादी उत्पादन प्रोग्रामची निर्मिती करणे हा या स्पर्धेचा उद्देश होता. मात्र, ही स्पर्धा केवळ प्रोग्रॅमिंगपुरती मर्यादित नव्हती तर स्पर्धकांची विचार क्षमता, सर्जनशीलता, नैतिक मूल्ये, सांघिक कार्यक्षमता, वेळेचे नियोजन आदी गुणांची पारखही याद्वारे करण्यात आली.आय.टी.क्षेत्रातील दिग्गजांकडून या स्पर्धेचे परीक्षण केले जाते. त्यांच्याकडून मिळणाºया सूचनांचा फायदाही स्पर्धकांना होतो. विजेत्या संघांना प्रोत्साहन देण्यासाठी यावेळी संस्थेचे अध्यक्ष विकास वर्तक, प्राचार्य डॉ. हरिश वणकुद्रे आवर्जून उपस्थित होते. या स्पर्धेला माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आशिष वनमाळी, आयोजक चंदन कोळवणकर, माधवी वाघमारे आणि समस्त प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.
संगणक कोडिंग स्पर्धेत फादर कॉन्सिसाव रॉड्रिक्स अभियांत्रिकी महाविद्यालय प्रथम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 11:33 PM