पंकज राऊतबोईसर : देशासह राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोना रुग्ण वाढत आहेत. कोरोनाचे सावट सर्वत्र असून तारापूर एमआयडीसीमध्ये नोकरीसाठी बाहेरून येणारे कामगार व अधिकारी तर परराज्यातून मालाची ने-आण करण्यासाठी मालवाहतूकदारांची मोठ्या प्रमाणात होत असलेली वर्दळ पाहता तारापूर औद्योगिक क्षेत्रात कोरोनाचा हाॅटस्पाॅट होण्याची भीती व्यक्त होत आहे. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन कोरोनाला वेळीच रोखणे प्रशासनापुढचे मोठे आव्हान असणार आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रात लहान, मध्यम व मोठे असे मिळून सुमारे साडेअकराशे उद्योग असून येथे पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह ठाणे, मुंबई, वसई-विरारपासून थेट गुजरात राज्यातून नोकरीबरोबरच कामधंदा व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात लोक रोज ये-जा करीत असतात तर रोज शेकडो हलक्या, मध्यम व अवजड मालाची वाहतूक करणारी वाहने जात-येत असतात. अशा विविध ठिकाणांहून येणाऱ्यांपैकी कुणीही व्यक्ती कोरोनाबाधित किंवा संक्रमित असला तर ते संक्रमण औद्योगिक क्षेत्रात पसरण्यास वेळ लागणार नसल्याने हा गंभीर धोका लक्षात घेऊन कठोर व पुरेशा उपाययोजनांची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
बाहेरून येणाऱ्या काही व्यक्ती व वाहनचालकांपासून कोरोनाच्या संभाव्य धोक्याच्या शक्यतेबरोबरच तारापूर औद्योगिक क्षेत्राच्या परिसरात कुंभवली, कोलावडे, पाम, टेम्बी, सालवड, शिवाजीनगर, पास्थळ, सरावली, खैरेपाडा, बेटेगाव, अवधनगर, धनानीनगर, संजयनगर, धोडीपूजा, आझादनगर इत्यादी अनेक नागरी वसाहती आहेत.
सर्वात मोठी नागरी वसाहत ही बोईसर ग्रामपंचायत क्षेत्रात असून यापैकी काही अशा नागरी वसाहती आहेत, त्यामध्ये छोट्याशा रूममध्ये गोरगरीब असंघटित कंत्राटी कामगार मोठ्या प्रमाणात दाटीवाटीने राहत असल्याने आरोग्य विभागाने या भागाकडेही नजर ठेवून जनजागृतीबरोबरच नियमित चौकशी करण्याची आवश्यकता आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव नष्ट होत नाही तोपर्यंत ही तत्परता तारापूर औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक, अधिकारी, कर्मचारी, कामगार व सर्व संबंधितांनी दाखवणे गरजेची असल्याचे मत व्यक्त होत आहे. कोरोनाचा संभाव्य फैलाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेने पुरेसे मनुष्यबळ व सोयी-सुविधा वाढवून परिसरातील वसाहतीत तपासणी सुरू करून लक्षणे दिसणाऱ्यांची त्वरित कोरोना टेस्ट करावी, अशीही मागणी नागरिक करीत आहेत.