- हितेन नाईक/अनिरुद्ध पाटीलपालघर/बोर्डी : पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांत खरिपातील भात पिकांचे अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने त्याची सारी भिस्त आता रब्बी हंगामातील उत्पादनावर आहे, मात्र जिल्ह्यात तीन महिन्यांपासून खताचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील मिरची, भाजीपाला आणि वेलवर्गीय उत्पादन तसेच उन्हाळी भातपिकावर त्याचा परिणाम होणार आहे. मात्र जिल्ह्याला १७ हजार टन युरिया खत मिळाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे असल्याने मग हा खताचा साठा गेला कुठे, असा प्रश्न शेतकरी वर्गाकडून उपस्थित केला जात आहे.पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांत ७५ हजार ६६८.३४ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. त्यातील ७९,८५६ हेक्टर एवढ्या क्षेत्रावर भात, नागली, वरई, तूर आदींसह वेलवर्गीय उत्पादने घेतली जातात. जिल्ह्यात ७५६६८.३४ हेक्टर भात क्षेत्रापैकी ७९८५६ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष भात लागवड करण्यात आली. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेले भातपिकांचे उत्पादन अगदीच नगण्य होते. हीच परिस्थिती नागली, वरई, तूर अशा पिकांसंदर्भात होती.अवकाळी पावसाने घास हिरावून घेतल्याने जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला होता. आता शेतकरी रब्बी हंगामाकडे वळला आहे, मात्र उत्पादनवाढीसाठी अत्यावश्यक असलेल्या युरिया खतांचा पुरवठा तीन महिन्यांपासून उपलब्ध झालेला नाही. मात्र १७ हजार टन युरियाचा पुरवठा झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण केल्याचा आरोप होत आहे.एकीकडे शेतकऱ्यांचे विविध गट आणि पिकांचे क्लस्टर करण्यासाठी राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाते. त्यामुळे मागील काही वर्षांत कृषी क्षेत्रात सकारात्मकता निर्माण होऊन या क्षेत्रातील अवलंबित्व आणि गुंतवणूक वाढली आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे, खते मिळू लागली. हे आश्वस्त करणारे चित्र असताना, ऐन हंगामात पालघर जिल्ह्यात खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामागे जिल्हा कृषी विभागाकडून नियोजन का केले गेले नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्ह्यात तीन महिन्यांपासून खतांचा तुटवडा; शेतकरी चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 1:25 AM