वसई : सोमवंशी व शेषवंशी क्षत्रीय समाजाची ग्रामदेवता असलेल्या नाळे येथील भूमिगत देवी पद्मावतीचा चैत्रमासी दर्शन सोहळा रविवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध धार्मीक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी देवीच्या मूळ मूर्तीचे विधीवत पूजन करून दुग्धाभिषेक करण्यात आला.त्यानंतर देवीस वस्त्रालंकार व आभूषणांनी सजवून पूर्वापार लावत असलेला मुखवटा चेहऱ्यावर लाऊन देवीची महाआरती करण्यात आली. त्यानंतर दर्शन सोहळा सुरू करण्यात आला. श्री नवचंडी यज्ञ व महाभंडाऱ्याचेही आयोजन करण्यात आले.यावेळी दिवसभरात दहा हजार भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. सूर्यास्ताअगोदर परंपरेनुसार देवीस पुन्हा भूमिगत करण्यात आले.नवसाला पावणारी व वेळोवेळी भक्तांच्या हाकेला धावून येणारी ही पद्मावती देवी विविध धार्मिक कार्यक्रम व नवसपूर्तीसाठी वर्षातून दोन वेळा जागविली जाते असे श्री पद्मावती देवी उत्सव कमीटीचे अध्यक्ष सुभाष म्हात्रे यांनी सांगितले. गेल्या काही वर्षात पालघर ,ठाणा,अलीबाग येथून हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असल्याचे ट्रस्टी अँड.दिलीप म्हात्रे यांनी लोकमतला सांगीतले.(वार्ताहर)
वसईत पद्मावतीदेवीचा सोहळा
By admin | Published: April 10, 2017 5:21 AM