बोईसर : पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कला आणि क्रीडा क्षेत्रातील होतकरू हिऱ्यांना खऱ्या अर्थाने पैलू पाडण्याचे काम बोईसर कला - क्रीडा महोत्सवाद्वारे होत असून यातूनच भविष्यात देशपातळीवरील खेळाडू तयार होतील असा आशावाद माजी खा. डॉ. संजीव नाईक यांनी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला.
महाराष्ट्र स्पोर्ट्स एज्युकेशन अॅकॅडमी - तारापूर, डॉन बॉस्को स्कूल आणि बोईसर एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सेवाश्रम विद्यालयाच्या सहकार्याने बोईसर येथील खोदारामबाग मैदानावर कला-क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी डॉ. नाईक यांच्या हस्ते त्याचे शानदार उद्घाटन करण्यात आले. या महोत्सवात सुमारे वीस हजार विद्यार्थी आणि खेळाडू सहभागी होण्याची शक्यता आहे. ६१ कला - क्रीडा प्रकारातील एकूण १९९ स्पर्धा या महोत्सवात घेण्यात येणार आहेत. रविवारपर्यंत हा महोत्सव सुरू राहील.
महोत्सवाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल डॉ. नाईक यांनी आयोजकांचे कौतुक केले. या महोत्सवामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंच्या कलागुणांना संधी मिळणार असून आपण सामाजिक बांधिलकी जपत आहात असे ते म्हणाले. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सीएसआर फंडातून बोईसर येथे क्रीडा संकुल आणि इनडोअर स्टेडियम बांधावे, अशी सूचना त्यांनी केली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना अॅकॅडमीचे कार्याध्यक्ष डिमेलो यांनी या महोत्सवात सुमारे दोनशे शाळांचेविद्यार्थी सहभागी होणार असल्याचे सांगितले. महोत्सवाच्या पहिल्या वर्षी पाच कला - क्रीडा प्रकार आणि १४ स्पर्धा आयोजित केल्या होत्या. तेव्हा ९२६ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यानंतर प्रत्येक वर्षी सहभागी होणाºयांची संख्या वाढत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय घरत यांनी केले.
उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र स्पोर्ट्स एज्युकेशन अकॅडमी (तारापूर) चे अध्यक्ष संजय पाटील, बोईसर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार वर्तक, डॉन बॉस्को स्कूलच्या मुख्याध्यापिका जानसी जोसेफ, म. स्पो. अकॅडमीचे कार्याध्यक्ष डॅरेल डिमेलो, उपाध्यक्ष ब्रॅडन आल्मेडा, गजानन देशमुख व हेमंत मुंजे, सहसचिव राम पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
महोत्सवात खेळले जाणारे खेळ
मार्च पास, लेझीम, पिरॅमिड, एकपात्री अभिनय, कथाकथन स्पर्धा, देशभक्तीपर समूहगीत, लोकनृत्य स्पर्धा, समूहनृत्य, सांघिक क्रीडा स्पर्धा - कबड्डी, खो-खो, लंगडी, व्हॉलीबॉल, बुद्धिबळ, कॅरम, वैयक्तिक मैदानी - जंप रोप स्पर्धा, तिरंदाजी, वक्तृत्त्व, निबंध, हस्ताक्षर, रंगभरणे, चित्रकला, शुभेच्छा कार्ड, मेहंदी, रांगोळी, भजन स्पर्धा.