मीरा रोड : मीरा-भाईंदरमधून भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांचा दणदणीत पराभव करून जायंट किलर ठरलेल्या भाजपच्या बंडखोर अपक्ष आमदार गीता जैन यांच्यासाठी भाजप आणि शिवसेना नेतृत्वाने फिल्डिंग लावली आहे.
जैन यांचे मन वळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आवाहन केले आहे. तर, दुसरीकडे निवडणुकीत उघड पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेनेही पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे या दोन्हीपैकी कोणता पक्ष त्या स्वीकारतात, याकडे राजकीय वर्तुळात उत्सुकता लागली आहे.
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करून निवडून आलेल्या आमदारांना भाजपने पुन्हा आपल्यासोबत वळवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. मीरा-भाईंदर मतदारसंघातून जैन यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र, पक्षनेतृत्वाने मेहतांच्या झोळीत झुकते माप टाकले होते. मेहता हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आमदार म्हणून ओळखले जात होते. शहरात नरेंद्र मेहता यांची मलीन झालेली प्रतिमा आणि नागरिकांमध्ये विविध कारणांमुळे त्यांच्याविषयी असलेला रोष यामुळे भाजपकडून मेहता यांना उमेदवारी मिळणार नाही, ही अपेक्षा फोल ठरल्याने जैन यांनी बंडखोरी केली. त्यावेळी शिवसेनेनेही त्यांना उघड पाठिंबा दिला. त्यांनी मेहता यांचा दारुण पराभव केल्याने भाजप आणि मेहता समर्थकांना चांगलाच धक्का बसला.
राज्यात सत्तेची समीकरणे जुळवण्यात अपक्ष आमदारांसह लहान पक्षांना मोठे महत्त्व आले आहे. मुख्यमंत्र्यांनीच १५ अपक्ष व बंडखोर आमदार आपल्या संपर्कात असल्याचे जाहीर केले होते. त्यातूनच मूळच्या भाजपच्या असलेल्या जैन यांना मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांनी भेटीसाठी बोलावून पुन्हा स्वगृही येण्याचे आवाहन केले आहे. या दोन्ही नेत्यांची जैन यांच्याशी भेट होऊन चर्चाही झाल्याचे भाजपच्या सूत्रांनी यास दुजोरा देताना सांगितले.
मेहतांमुळे पक्षाची आणि खुद्द मुख्यमंत्र्यांची प्रतिमा डागाळली आहे. महापालिका आणि शहरातही अनागोंदी, एकाधिकारशाही, गैरप्रकारांमुळे सामान्य नागरिकांपासून प्रशासनामध्येही मेहता यांच्याबद्दल नाराजी आहे. त्यामुळे भाजपचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात गीता जैन यांच्या रूपाने नेतृत्वबदलाची मागणी भाजपच्या निष्ठावंतांसह संघाच्या स्वयंसेवकांमधूनही होत आहे. त्यातच पक्षश्रेष्ठींनीही जैन यांना स्वगृही येण्यास सांगितले आहे.
दरम्यान, काँग्रेसचे उमेदवार मुझफ्फर हुसेन यांनी जैन यांचे अभिनंदन केले आहे. जैन यांचा विजय म्हणजे येथील मतदारांनी भ्रष्टाचार, अन्यायाला हटवले असे हुसेन यांनी सांगितले. मेहता यांनी व्हीडिओद्वारे जैन यांचे अभिनंदन केले आहे. निवडणुकीआधीपासूनच या दोघांमध्ये कमालीचे वितुष्ट निर्माण झाले होते. तेव्हाच जैन या निवडणूक लढवणार हे सिद्ध झाले होते. पक्ष कुणाला तिकीट देणार यावर अवलंबून होते. मात्र पक्षाने मेहता यांना पुन्हा संधी दिली.
जैन यांनी भाजप बंडखोर म्हणून अर्ज भरत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली.शिवसेनेचाही मेहता यांच्यावर राग असल्याने ते कितपत मदत करणार हा संशोधनाचा विषय होता. मेहता यांनी वारंवार शिवसेनेला अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे हा असंतोष निवडणुकीतून अखेर बाहेर आला. शिवसैनिकांनी उघडपणे जैन यांचा प्रचार करायला सुरूवात केल्यामुळे मेहता यांचा पराभव होणार अशी अटकळ होती.
शिवसेनेची जोरदार मोर्चेबांधणी सुरू
निवडणुकीत उघडपणे गीता जैन यांना पाठिंबा देऊन प्रचार करणाºया शिवसेनेनेही त्यांना आपल्यासोबत येण्याचा आग्रह धरला आहे. राज्यात सत्तेच्या समीकरणात शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याने जैन यांनी सेनेसोबत यावे, यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.