आशिष राणे
वसईच्या ऐतिहासिक वास्तू म्हणून ओळख असलेल्या रणवीर चिमाजी अप्पाच्या प्रवेशद्वाराजवळील खजुराच्या झाडांना भीषण आग लागल्याची घटना सोमवारी रात्री 9.30च्या सुमारास घडली आहे. दरम्यान या आगीच्या दुर्घटनेत मात्र कोणतीही जीवितहानी अथवा कोणी जखमी झालेला नसल्याची माहिती वसई विरार महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी लोकमतला दिली आहे.
परिणामी सोमवारी रात्री उशिरा अचानकपणे लागलेल्या आगीत किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेली खजुराची झाडे व गवत मात्र जळून खाक झाले. परंतु वेळीच समजले म्हणून तात्काळ स्थानिक लोकांनी वसई पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावले असता घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने ही आग तासाभरात आटोक्यात आणली. एकूणच मात्र ही आग या ठिकाणी कशी लागली अथवा आगीचे नेमकं कारण अद्याप कळू शकलं नाही.
किंबहुना किल्ल्यात येणाऱ्या उनाड टप्पू किंवा गर्दुल्ल्यांनी ही आग लावली असावी, असा काहीसा संशय या ठिकाणी व्यक्त केला जात आहे. अचानकपणे लागलेल्या या आगीची वार्ता मात्र काही वेळातच वसई व वसईच्या बाहेर पसरताच मोठ्या प्रमाणावर चर्चेला उधाण आले होते.