शौकत शेखडहाणू : वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीची रविवारी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये कोणत्याही परिस्थितीत वाढवण बंदर होऊ देणार नाही, असा निर्धार व्यक्त करण्यात आला असून वाढवण बंदरविरोधी भडकलेले आंदोलन चिरडून टाकण्यासाठी सरकारने पोलीस बळाचा वापर केला असला, तरी वाढवण बंदरविरोधातील लढा अधिक तीव्र होणार आहे.
वाढवण बंदरविरोधी आंदोलनात आता सर्व मच्छीमार संघटना, आदिवासी एकता परिषद, कष्टकरी संघटना, कोकण विकास आघाडी तसेच डहाणूच्या पश्चिम भागातील असंख्य गावखेड्यापाड्यांतील ग्रामस्थ सहभागी होऊन लवकरच पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे, तसेच रास्ता रोको आंदोलनही छेडण्यात येणार आहे.
स्थानिक जनतेचा तीव्र विरोध असतानाही केंद्र सरकार वाढवण बंदर उभारण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहे. त्यासाठी स्थानिकांची आंदोलने चिरडून टाकली जात आहेत. स्थानिकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झालेला असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे आंदोलने छेडली जात आहेत. गेल्या शुक्रवारी, २७ नोव्हेंबर रोजी वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना, केवळ कोरोना महामारीच्या काळात जनजागृतीसाठी मोटारसायकल रॅलीचे आयोजन केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी धरपकड करून ताब्यात घेतले होते. त्याचे तीव्र पडसाद परिसरात उमटू लागले आहेत. या आंदोलनात सर्व संघटनांबरोबरच सर्व सामाजिक संघटना आणि सर्व ग्रामपंचायतींनी पाठिंबा दर्शविला आहे. त्याकरिता लवकरच सर्व संघटनांची एकत्रित बैठक घेऊन त्यांत पुढील आंदोलनाच्या बाबतीत नियोजन केले जाणार आहे.
सरकारचे लक्ष वेधणारबंदरविरोधी संघर्ष समितीच्या रविवारी झालेल्या बैठकीत महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, नॅशनल फिशवर्कर्स फोरम, ठाणे जिल्हा मध्यवर्ती मच्छीमार संघ यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत बंदरविरोधी आंदोलन अधिक तीव्र करून त्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचे, त्याचबरोबर रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष अनिकेत पाटील यांनी दिली.