नाना पटोलेंच्या विधानाचा अप्रचार करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा, काँग्रेसची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2022 12:03 AM2022-01-19T00:03:00+5:302022-01-19T00:03:18+5:30
काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे पोलिसांना निवेदन
आशिष राणे
वसई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा दुरुपयोग करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल अपशब्द बोलून खोटा प्रचार करणाऱ्या व त्यांचा पुतळा जळणाऱ्या वसई विरार भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करून योग्य ती कार्यवाही करावी अशा मागणीचे निवेदन वसई विरार जिल्हा काँग्रेसच्या वतीने वसई विरार पोलिस आयुक्तालय तर्फे वसई विरार मधील तुळींज, पेल्हार आदी विविध पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना देण्यात आले अशी माहिती वसई विरार शहर जिल्हाध्यक्ष ओनिल आल्मेडा यांनी दिली.
यावेळी महिला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रांताध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांनी भंडारा जिल्ह्यातील स्थानिक गाव गुंडाविरुद्ध केलेल्या वक्तव्याचा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संबंध जोडून भाजपच्या लोकांनी पंतप्रधान पदाचा अपमान केला आहे. अशा खोट्या बातम्या, खोटा प्रचार, प्रसार करणाऱ्या भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावर कडक कारवाई करावी. तसेच अशा लोकांनी सोशल मीडियावर केलेल्या खोट्या अपप्रचाराची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी. तसेच सोमवार दि. १७ जानेवारी २०२२ रोजी वसई विरार शहर जिल्हा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज बारोट व भाजपचे पदाधिकारी व समर्थक यांनी नालासोपारा पूर्वेला राधाकृष्ण हॉटेल परिसरात काँग्रेस नेते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांचा पुतळा जाळला आहे. प्रसार माध्यमातून याचे चित्रण व बातम्या प्रसारित झाल्या आहेत. याची गंभीर दखल घेऊन सर्व संबधितांवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी असेही शेवटी निवेदनात म्हटले होते.
त्याप्रमाणे पोलिसांनी तुळींज पोलिस ठाण्यात भाजपच्या संबंधित १५ पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हा रजि नं. ४०/२०२२ नुसार भा. दं. वि. सं. कलम २६९, २७०, १८८ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१)(३), १३५ तसेच साथरोग प्रतिबंध १८९७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडा यांनी लोकमतला दिली एकूणच अपप्रचार करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर कारवाई व्हावी यासाठी राज्याच्या गृहमंत्र्यांना सुद्धा या निवेदनाची प्रत देण्यात आल्याचे ओनिल आल्मेडा यांनी याप्रसंगी सांगितले