वाडा : तालुक्यातील सर्वाधिक वर्दळीचा अंतर्गत समजला जाणारा कुडूस-चिंचघर-गौरापूर या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून यास जबाबदार असणाऱ्या ठेकेदार व शाखा अभियंता यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कुणबी सेनेने आजपासून तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणामुळे बांधकाम प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.कुडूस-चिंचघर-गौरापूर हा १२ किमी अंतराचा रस्ता असून पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून हा रस्ता मंजूर झाला आहे. या रस्त्यासाठी ९ कोटी ४० लाखांचा निधी मंजूर झाला असून कुडूस ते चिंचघर हा १३५० किमी पर्यतचा रस्ता क्र ॉकीटीकरण होणार असून चिंचघर ते गौरापूर रस्ता डांबरीकरण होणार आहे. रस्त्याचे काम सांगळे कंट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. कंपनीने सबठेका ठेकेदार संदीप गणोरे व हर्षद गंधे यांना दिले आहे. रस्त्याचे काम सुरू असून ते निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप कुणबी सेनेने केला आहे. दरम्यान, हर्षद गंधे यांना संपर्क साधला असता आम्ही कोणताही अपराध केला नसून गुन्हा कोणत्या आधारे नोंदविणार असा प्रश्न विचारला. शिवाय रस्त्यासाठी जागा उपलब्ध करतांना स्थानिकांनी खूप आडकाठी केली आहे तसेच ती सुरु असल्याने वेळ लागत असल्याचे ते म्हणाले.असे आहेत कुणबी सेनेचे आरोपरस्त्यासाठी वापरले जाणारे साहित्य हे अंदाजपत्रकानुसार वापरले जात नाही. या रस्त्यावर लॅब असणे गरजेचे आहे. मात्र ती कुठेही दिसत नाही. माती मुरूम याच्या चाचण्या घेतल्या जात नाहीत. माºयांसाठी वापरले जाणारे पाईपला दोन्ही बाजूंनी क्र ेसिंग करून पाईप टाकला पाहिजे.परंतु तसे नियमानुसार होत नाही. त्यामुळे रस्त्यावर दाब आल्यास पाईप फुटण्याची शक्यता आहे. विशेषत पाईप टाकण्याआधी त्याखाली काही जाडीचे क्र ॉकीटीकरण करावयास पाहिजे मात्र ते त्या जाडीचे होत नाही.जे खडीकरण केले आहे ते बरोबर दाबले गेले नसल्याने रस्ता उखडला गेला आहे. सिमेंट कामावर पाणीच मारण्यात आले नाही. रेती ऐवजी गिरीट पावडर वापरल्याचा आरोप कुणबी सेनेचे उपतालुकाप्रमुख प्रदीप हरड यांनी केले आहेत.२६ ते ३० मार्च दरम्याना चाचणी : यासंदर्भात पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता रविंद्र दुधे यांच्याशी संपर्क साधला असता कुडूस-चिंचघर-गौरापूर हा १२ किमी अंतराचा या रस्त्याच्या दर्जाबाबत येत्या २६ ते ३० मार्च २०१८ पर्यंत चाचणी करून घेण्यात येईल. त्यानंतर रस्त्याच्या दर्जाबाबत समजू शकेल अशी माहिती त्यांनी दिली.
ठेकेदार, शाखा अभियंत्यावर गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 12:22 AM