विरार : वसई-विरार परिसरात गॅस वितरक अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिकांच्या जिवाशी खेळ मांडत असल्याचे समोर आले आहे. नालासोपारा पश्चिम येथील नागरी वस्तीत गॅस सिलिंडरच्या गाड्या उभ्या करून नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण करत आहेत. विशेष म्हणजे गॅसने भरलेले हे सिलिंडर भंगार वाहनांत ठेवलेले असल्याने वाढत्या उन्हात दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.वसई पुरवठा विभागाकडील माहितीनुसार, वसई-विरार परिसरात तीन लाख ३२ हजार ३९५ गॅस ग्राहकांची नोंद आहे, तर २६ वितरक गॅस सिलिंडरचा पुरवठा करत आहेत. मात्र गॅस वितरक भरलेले गॅस सिलिंडर भंगार अवस्थेतील वाहनांत ठेवत आहेत. काही ठिकाणी तर गॅस वितरणासाठीच भंगार वाहनांचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे.विशेष म्हणजे या वाहनांची वाहन योग्यता चाचणी केली जात नाही. प्रदूषण चाचणी तसेच या गाड्यांचा विमा उतरवलेला नसतो. यामुळे ही धोकादायक वाहने अतिज्वलनशील पदार्थ घेऊन जात असताना कोणत्याही अपघाताला बळी पडू शकतात. या वाहनात आग प्रतिबंधक उपकरणे नसतात. यामुळे अपघात झाल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते.नालासोपारा पश्चिम येथे उभा असलेला ट्रक अगदी भंगार अवस्थेत गेला आहे. या वाहनाला दिवे नाहीत, टायर पंक्चर आहेत. हे वाहन भंगार अवस्थेत असतानाही या वाहनातून ५० ते ७० सिलिंडर ठेवण्यात आले आहेत. वितरकांच्या अशा निष्काळजीमुळे नागरिकांचा जीव धोक्यात असल्याने अशा वितरकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
भंगार वाहनात आढळले भरलेले गॅस सिलिंडर; वितरकांचा निष्काळजीपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 12:33 AM