बोर्डी : पारनाका समुद्रकिनारी सोमवारी सायंकाळी फिनलेस पोरपोईझ या जातीच्या माशाचे लहान पिल्लू भरतीच्या लाटांनी किनाऱ्यावर आढळून आले. दरम्यान वनरक्षक समाधान पाटील यांनी अविवेकी पर्यटकांच्या तावडीतून सोडवून त्याला जीवदान दिले.
हा मासा पाण्याबाहेर येऊन तडफडत होता, मात्र यावेळी किनाºयावर फिरण्यासाठी आलेल्यांपैकी काही असंवेदनशील नागरिकांची त्याच्यासह सेल्फी काढण्याकरिता चढाओढ करीत असल्याचे वनरक्षक समाधान पाटील यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ माशाला उचलून पाण्यात सोडले मात्र ते पुन्हा किनाºयावर आले. त्यामुळे त्यांनी याबाबत वाईल्डलाईफ कंन्झर्वेशन अँड एनिमल वेल्फेअर असोसिएशन या प्राणीमित्र संस्थेला कळविले.
या संस्थेचे संस्थापक धवल कंसार यांनी त्याला उपवन संरक्षक कार्यालयाच्या आवारातील कासव पुनर्वसन व संवर्धन केंद्रातील समुद्राचे पाणी भरलेल्या टाकीत ठेवण्याचे सुचिवले. या माशाची लांबी सुमारे तीन फूट आणि वजन सहा किलो असल्याची माहिती पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली. दरम्यान येथील किनाºयावर महिण्याभरापूर्वी याच जातीचा सुमारे पाच फूट लांब मासा मृतावस्थेत आढळला होता.