तलवाडा : दडी मारलेल्या पावसाचे जुलै महिन्याच्या अखेरीस का होईना दमदार आगमन झाल्याने विक्रमगड तालुक्यात लावणीच्या कामांनी वेग घेतला आहे. लावणीची कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. यंदा बी-बियाणे व खते शेतकरीवर्गास मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली आहेत. पावसाच्या दमदार आगमनाने सध्या तरी शेतकरी सुखावला आहे. आदिवासी शेतकऱ्यांनी पूर्वापार चालत आलेल्या आपल्या आदिवासी रीतिरिवाजाप्रमाणे शेतावरील देवदेवतांना नैवेद्य दाखवून लावणीच्या कामांना सुरुवात केली. मात्र, पावसाने ऐन मोसमात दडी मारल्याने अनेकांच्या भातशेतीचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील ९५ गावपाड्यांतून ८६ गावपाडयांत ७,५५८ हेक्टर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर भातशेती करण्यात येते. सुमारे ७,५५८ हेक्टर क्षेत्रातील जमिनीमध्ये यंदा भातशेती लागवड होत आहे. गतवर्र्षीप्रमाणे यंदाही पावसाने शेतकऱ्यांना हुलकावणी दिली. मात्र, जुलैअखेरीस पावसाने दमदार सुरुवात केल्याने नांगरणी, पेरणी व आता लावणीच्या कामांना वेग आला आहे. आता पावसाने लहरीपणा सोडला आणि आपले वेळापत्रक सांभाळले तर ते भातशेतीला उपकारक ठरेल.पावसाने ओढ दिल्याने खचलेल्या शेतकऱ्याला गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने नवी उभारी दिली आहे. यांत्रिक भातलावणी या तालुक्यातही सुरू व्हावी, अशी बळीराजाची इच्छा आहे.मजुरांनी भाव खाल्ला१शेतीच्या कामासाठी मजूर मिळत नसल्याने मजुरीच्या दरात वाढ झाली आहे. पुरुषांना २०० रुपये तर स्त्रियांना १५० रुपये मजुरी दिली जाते. विक्रमगड, डहाणू, वाडा व नाशिक या भागांतून मजूर आणण्यासाठी शेतकऱ्यांना वणवण भटकावे लागत आहे. २या मजुरवर्गात प्रामुख्याने आदिवासी मजुरांचा समावेश असतो. येथील शेतकरी जया, रत्ना, कोलम, गुजरात-११, सुवर्णा, कर्जत-३, मसुरी अशा विविध प्रकारच्या भाताचे उत्पन्न घेत आहेत. यंदा भातबियाणे, खते व मजुरीचे दर वाढल्याने शेती न परवडणारी झाली असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.३खत-बियाणे व मजुरीस येणारा खर्च उत्पादन केलेला माल विकून वसूल होत नसल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले. काही शेतकऱ्यांनी आपली शेती दुसऱ्यास कराराने कसण्यास दिली आहे.
भातलावणी अंतिम टप्प्यात
By admin | Published: July 27, 2015 3:10 AM