हुसेन मेमन जव्हार : मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू होऊन २५ दिवस पूर्ण झालेले आहेत. सकाळी ४.२८ वा. रोजा बंद करणे तर सायंकाळी सूर्यास्त नंतर ७.१७ ला रोजा सोडणे मध्यंतरीच्या काळात थुंकीपण गीळू नये असे फर्मान असून त्याचे पालन मुस्लिम बांधव करीत असून रोजाचा कालावधी १५ तासांचा होत आहे. शनिवारी लैलतूल कद्रची रात्र म्हणून संबोधली जात असून या रात्रीचे महात्म्य १००० रात्री पेक्षा पवित्र मानले जाते, या रात्रीत मुस्लिम बांधव मस्जिदमध्ये रात्रभर विविध प्रकारे पठन करून अल्लहाची प्रार्थना करुन पूण्य कमवतात.
रमजान महिना हा उपवासाचा (रोजा) महिना या महिन्यात प्रत्येक मुस्लिम व्यक्तीने रोजा ठेवावा, असे सांगितलेले आहे. याच महिन्यात अल्लाहाने आपल्या पवित्र ग्रंथाचे म्हणजेच कुरआनचं अवतरण अंतिम प्रेषित मुहंम्मद पैगंबर (स.अ.व.) यांच्यावर केलेले आहे. याचं पठण या महिन्यात अत्यंत पवित्र मानले जाते. मानवाला नैतिक व्यवस्थेच्या त्रिकोणी संगमाचा लाभ कुरआन व रमजान यामुळे मिळाला आहे. पवित्र अशा कुरआनामध्ये सूमारे १५८ पेक्षा जास्त आयती असून त्यामध्ये १०० पेक्षा जास्त हदीस या विषयाबाबत आढळतात. ज्या व्यक्तीकडे अल्लाहची कृपा असेल त्यानी सर्व काही साध्य केले आहे असे मानले जाते. तुम्ही स्वत:ला अल्लाहसमोर हजर समजावे किंवा अल्लाह आपल्या जवळ असल्याचा विश्वास असावा. त्याशिवाय कोणत्याही सत्कार्याला पूर्णत्व येत नाही. अल्लाह कृपेची आशा माणसाला सत्कार्याची प्रेरणा देते व अपराध्यांच्या भयानक परिमाणाच भय अल्लाहच्या अवकृपे पासून दूर ठेवते. आपण अल्लाहच्या प्रसन्नतेपासून आपला बचाव करतो आणि वाईटापासून दूर राहून चांगुलपणा आत्मसात करतो, यालाच अल्लाहची कृपा म्हणतात. अल्लाहने कुरआनात म्हंटले आहे की, पालन कर्त्यासमोर उभे राहण्याचे भय बाळगावे आणि वाईट इच्छेपासून मनाला दूर ठेवावे म्हणजे र्स्वग प्राप्ती होईल रामजानच्या पवित्र महिन्यात जो रोजा (उपवास) ठेवला जातो, त्यामागे देखील एक तत्व आहे. रोजा मनुष्यातील प्रबळ अशा स्वभाविक इच्छांवर नियंत्रण ठेवतो. पहाटेच्या सहेरी नंतर ते रोजा सोडणे पर्यतच्या काळात मनुष्य तहानलेला, भुकेला असतो. पण काही एक खाण्या पिण्यापासून रोजा त्याला परावृत्त करीत असतो. अशा व्यक्तीमध्ये संयम आणि सहनशक्ती याच्या बरोबर अल्लाहाची कृपा निर्माण होत असते. अशा प्रकारे रोजा मनुष्यामध्ये स्वत:ला नियंत्रित करून उत्कट स्वाभाविक इच्छांवर नियंत्रण ठेवतो, हिच शक्ती कृपा निर्माण करते. नमाज व रमजानच्या उपवासामध्ये एक विशिष्ट वेळी खाणेपिणे करायला लावणे व एका विशिष्ट वेळी ते सोडायला लावण्याची शिस्त लावण्याचा उद्देश या महिन्यात अल्लाहने कुरआनच्या रूपाने जे आदेश अवतरीत केले, त्यांच्यावर प्रसन्नतेसाठी त्याच्या आदेशाचे पालन करणे, हिच अल्लाहपरायणता आहे आणि उपवासामागे ती नसानसात भिनवण्याची अल्लाहची योजना आहे. असा हा रमजान महिना व या महिन्यातील रोजे याचे महत्व आहे.