आशिष राणे, वसई
मुंबई - कोरोना विषाणूच्या जीवघेण्या संकटामुळे राज्यातील तीन महानगरपालिकांच्या निवडणूका यापूर्वीच पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर या तिन्ही महापालिकांच्या मुदती संपुष्टात आल्याने यापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाला या महापालिकावर प्रशासक नियुक्तीची शिफारस करण्यासंदर्भात पत्र दिले होते. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनावर राज्याच्या नगरविकास खात्याने प्रशासक नेमण्याची राज्य निवडणूक आयोगाची शिफारस मान्य करीत तसे प्रशासक नियुक्तीचे आदेशच सरकारने जारी केले आहेत. दरम्यान वसई -विरार शहर महापालिकेचे प्रशासक म्हणून वीस दिवसांपूर्वी नव्याने धुळे येथून नियुक्त झालेले मनपा आयुक्त गंगाथरन देवराजन हेच या महापालिकेचे काम पाहणार आहेत हे विशेष .
वसई विरार शहर महानगरपालिकेची मुदत 28 जून 2020 रोजी संपुष्टात येत आहे.तर कोरोना मुळे याआधीच सरकारने या निवडणूका पुढे ढकलल्या आहेत. असे असताना देखील व दि.28 जून पुर्वी नव्याने महापालिका अस्तित्वात येणे कायद्याने बंधनकारक होते पण ते आता शक्य नाही. त्यामुळे आता महानगर पालिकेवर प्रशासक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकूणच मागील तीन महिन्यांपासून महापालिका प्रशासनाचा कारभार हा पालघर जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे हे पाहत होते, तर नवीन आयुक्त तथा वसई विरार महापालिकेला आय ए एस दर्जा प्राप्त आयुक्त मिळणार का यासाठी वसईतील विरोधक व राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार हे आग्रही होते, त्यानुसार वीस दिवसांपूर्वीच धुळे जिल्हाधिकारी म्हणून राहीलेले आय ए एस गंगाथरन देवराजन यांची वसई विरार मनपा पदी नियुक्ती झाली आणि त्यांनी पदभार ही स्वीकारून दणकेबाज कामास सुरुवात ही केली आहे. त्यामुळे राज्यातील शिवसेना व वसई -विरारकरांच्या मनात महानगरपालिकेवर प्रशासक नियुक्त करावा, असं मनोमनी होतंच. पण तशी परिस्थिती निर्माण होत नव्हती. अखेर कोरोना विषाणूमुळे आता ते शक्य झालं आहे. कारण संपूर्ण पणे कोरोनामुक्त महाराष्ट्र होत नाही, तोपर्यंत कोणतीही निवडणूक राज्यात होणार नाही. त्यामुळे येणाऱ्या जून किंवा त्याही पुढे जाऊन ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत या निवडणूका पुढे जाऊ शकतात.
अर्थातच कोरोनाच्या संकटात या निवडणुका लवकर होणं शक्य नाही. त्यामुळे या तीनही महापालिकांवर प्रशासक नियुक्त करावा, असं पत्र राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिलं होतं. यदाकदाचित कोरोनाच्या संकटात या महापालिकांना मुदतवाढ मिळेल अशी चर्चा होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाने निवडणूक आयोगाने या महापालिकांना मुदतवाढ न देता त्यांच्यावर प्रशासक नियुक्त करण्याच्या सूचना देखील राज्य सरकारला केल्या होत्या
वसई विरार शहर महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती ! नवनियुक्त आयुक्तच गंगाथरन देवराजन झाले प्रशासक !
लॉकडाऊनमुळे महापालिकेची निवडणूक स्थगित केल्याने अखेर मंगळवारी सायंकाळी राज्य सरकारचा निर्णय झाला.यात दि.28 जून 2020 च्या मध्यरात्रीपासून वसई विरार शहर महापालिकेचा कारभार प्रशासक म्हणून सांभाळणार असून वीस दिवसांपूर्वी पदभार स्वीकारलेले गंगाथरन देवराजन यांची च प्रशासकपदी नियुक्त केल्याचे सरकारच्या नगरविकास विभागाने परिपत्रकाद्वारे त्या त्या महापालिकेला तसे आदेश कळविले आहे. तर आयुक्त व प्रशासक अशा दुहेरी भूमिकेत सध्याचे आयुक्त पालिका प्रशासनाचा कारभार हाताळणार आहेत.