मीरारोड - २४७ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या नवीन वरसावे उड्डाणपूलचा डांबरी रस्ता निकृष्ठ निघाल्याने आता रस्ता खोदण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सदर रस्ता खोदून नव्याने बनवला जाणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुंबई - अहमदाबाद महामार्गावर २४७ कोटी खर्चून नवीन उड्डाणपूल बांधला. हा नवीन ४ पदरी पूल २८ मार्च २०२३ रोजी वाहतुकीसाठी खुला केल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले होते. मात्र पुलाच्या पहिल्याच पावसाळ्यात पुलावर अनेक खड्डे पडून रस्त्याखालील लोखंडी सळ्या दिसू लागल्या. जेणे करून कामाच्या दर्जा वरून टीकेची झोड उठली.
पुलावर खड्डे पडून लोकांच्या जीवितास व सुरक्षिततेस धोका निर्माण केल्या बद्दल २६ जुलै रोजी काशीमीरा पोलीस ठाण्यात विजय एम. मिस्ञी कन्ट्रक्शन, आशिष शर्मा आणि अशोक थोरात यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नव्या वरसावे पुलावर अवघ्या तीन महिन्यात खड्डे पडून जवळपास ६८ ठिकाणी सळया बाहेर आल्याने अपघाताची भीती वाढून नागरिक सुद्धा त्रस्त झाले. खासदार राजेंद्र गावित यांनी गडकरी यांना भेटून नवीन पुलावर खड्डे पडल्या बद्दल तक्रार केली होती.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उड्डाणपूल वरच्या रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी दिल्ली वरून तज्ज्ञांचे पथक पाठवले होते. पथकाने प्रत्यक्ष पाहणी करत कामाचे नमुने तपासणी साठी घेतले होते. त्याचा अहवाल आल्यानंतर मिनिस्ट्री ऑफ रोड अँड हायवे व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महामार्ग यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान उड्डाणपूलावरील निकृष्ठ कामा बद्दल प्राधिकरण ने आता रस्ता खोदून पुन्हा नव्याने रस्ता बांधकाम करण्याचे सुरू केले आहे. यामुळे काम पूर्ण होई पर्यंत पुन्हा वाहतूक कोंडी होणार आहे.