विरार : कोरोना प्रादुर्भाव काळात जवळजवळ ८ महिने बंद असलेली वसई-विरार शहर महापालिकेची बससेवा पुन्हा नव्या ठेकेदारासह आणि नव्या बसेससह नवीन वर्षाच्या सुरुवातीला सुरू होत आहे.वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रात कोरोना प्रादुर्भाव कमी होत आहे. जनजीवन पूर्वपदावर येत असताना, प्रवास करण्यासाठी नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. खासगी वाहन, रिक्षा करून महागडा प्रवास करावा लागत आहे. वसई-विरार शहर महापालिकेच्या परिवहनसेवा सुरू करावी, अशी मागणी सर्वत्र जोर धरू लागली आहे. महापालिकेच्या परिवहन समितीमार्फत नव्या वर्षाच्या सुरुवातीला बससेवा सुरू करण्यासाठी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस बस सुरू होणार होत्या. मात्र, सोपस्कार पूर्ण करून पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यांत परिवहनच्या बसेस वसई तालुक्याच्या विविध मार्गावर धावण्यास सुरुवात होणार आहे. महापालिका प्रशासनाकडून परिवहनसेवा देण्यासाठी एस.एन.एन. कंपनी या ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे.जीपीएस व ओपीडी प्रणालीने आरामदायी अशा २७ व ४० आसनाच्या ९१ बसेस पहिल्या टप्प्यात सुरू होणार आहेत. या बसेस सर्व ४३ मार्गावर धावणार आहेत. ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, अपंग इत्यादी यांना सवलतीच्या सुविधा मिळणार आहेत. सध्या २९ गावांचा प्रश्न चर्चेत आहे, गावे महापालिकेत राहणार की वगळणार, हा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. मात्र, निर्णय काहीही असो, आ. हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व संकल्पनेतून साकारलेली ही बससेवा सर्व गावात, ग्रामीण भागात सुरू राहणार असल्याचे परिवहनसेवा समिती सभापती प्रीतेश पाटील यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात ३० बसेस बसेस सुरू करण्यासाठी परिवहनसेवेच्या ताफ्यात पहिल्या टप्प्यात एकूण ३० बसेस धावणार आहेत. २२० चालक, २२० वाहक, वाहतूक नियंत्रक ४०, पर्यवेक्षक ७, स्थानक प्रमुख ६, लेखनिक ८, लेखाकार १, शिपाई ३, स्वच्छक ८ अशी एकूण ५१३ जणांची पदभरती करण्यात येत आहे. हे सर्व कर्मचारी एस.एन.एन. ठेकेदाराच्या आस्थापनेवर काम करणार असून, महापालिका प्रशासनाशी संबंध असणार नाही.