हुसेन मेमन
जव्हार : जव्हार प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येणारी आश्रमशाळा विनवळ येथे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नुकतीच भेट दिली होती. त्या वेळी आश्रमशाळेतील मुला-मुलींचे वसतिगृह हे जुन्या इमारतीत करण्यात आले होते, मात्र त्या वसतिगृहाची अवस्था अत्यंत बिकट असल्याने दरेकर यांनी प्रथम मुलींना नवीन वसतिगृहात तातडीने स्थलांतर करण्याचे आदेश दिले होते. पाणी व्यवस्था व इमारतीत किरकोळ दुरुस्ती बाकी होती. काचा फुटल्याने मुलींना त्या इमारतीत ठेवणे योग्य नव्हते, मात्र दरेकर यांनी आदेश देताच इमारतीच्या फुटलेल्या काचा बदलून आणि तातडीने पाण्याच्या टाक्या खरेदी करून वसतिगृह तयार करून १७८ मुलींना स्थलांतर करण्यात आले आहे.
जव्हार प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळा ही १२७८ विद्यार्थी असलेली इ. पहिली ते बारावी विज्ञान शाखा असलेली सर्वात मोठी एकमेव शाळा आहे. याकरिता शासनाने शाळेकरिता मोठी प्रशस्त इमारत नुकतीच बांधली आहे. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेकरिता मुलांचे वसतिगृह बांधण्यात आलेले नाही. तसेच मुलींचे वसतिगृह बांधले, मात्र दुरुस्तीअभावी निवासी विद्यार्थी जुन्या शाळेच्या इमारतीत राहत होते. दरेकर यांनी अचानक भेट दिली असता वास्तव समोर आले आणि आज इमारत दुरुस्त करून विद्यार्थ्यांना तत्काळ स्थलांतर करण्यात आले आहे. दरेकर यांच्या शाळा भेटीच्या वेळी तेथे सांस्कृतिक भवन व मुलांचे सुसज्ज वसतिगृह बनवण्याची मागणीही करण्यात आली.इमारत नुकतीच ताब्यात देण्यात आली होती, मात्र खिडकीच्या काचा फुटल्यामुळे व पाण्याची सोय नसल्यामुळे मुलींना नवीन इमारतीत स्थलांतर करणे योग्य नव्हते, मात्र आता या सर्व सुविधा पुरविण्यात आल्या असून १७८ मुलींचे नवीन वसतिगृहात स्थलांतर करण्यात आले आहे.- रामदास ठोमरे,मुख्याध्यापक,विनवळ आश्रमशाळा