पारोळ : तानसा नदीवरील मेढे पुलाच्या कामाला अखेर सुरुवात झाली असून, दोन वर्षांपूर्वी दोनदा कामाच्या शुभारंभाचा नारळ फुटला होता. मात्र, या पुलाचे काम बंदच होते. पुलाच्या कामात दोन वर्षे फक्त खड्डे खणले आणि पुन्हा पावसाळा आल्यावर ते भरले होते. दरम्यान, आता काम सुरू झाल्याने या वर्षी तरी हे काम होईल का, असा प्रश्न या भागातील नागरिक विचारत आहेत.मार्च महिन्यात पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
मेढे ते मेढेफाटा दरम्यान तानसा नदीवर असलेला या पुलाची उंची कमी असल्याने दरवर्षी पावसाळ्यात तो पाण्याखाली जातो. यामुळे पलीकडे असलेल्या आडणे, आंबोडे, मेढे, वडघर, कळभोन, लेंडी या गावांचा संपर्क तुटतो. दोन-तीन दिवस या पुलावर पाणी असल्याने या भागातील नागरिकांचे मोठे हाल होतात. तर नोकरदारांना नोकरीवर आणि मुलांना शाळेतही जाता येत नाही. पूल बुडालेला असताना उपचारासाठी दवाखान्यात नेता न आल्याने अनेकांचे जीवही गेले आहेत. यामुळे या पुलाची उंची वाढविण्याबाबत या भागातील नागरिक सातत्याने मागणी करीत होते. या पुलाची उंची वाढविण्यापेक्षा या ठिकाणी नवीन पूल मंजूर करण्यात आला. यामुळे या भागातील नागरिकांची मोठी समस्या मार्गी लागली आहे. मात्र दोन वर्षे या पुलाचे काम रखडल्याने नाराजीही व्यक्त होत होती. दरम्यान, या भागातील आमदारांनी प्रयत्न केल्याने या वर्षी कामाला सुरुवात झाली आहे.
पूल पाण्याखाली जात असल्याने पावसाळ्यात आम्हाला मोठा त्रास सहन करावा लागतो. पण, या ठिकाणी आता नवीन पुलाच्या कामाला सुरुवात झाल्याने आमची गैरसोय टळणार आहे.- लक्ष्मीप्रसाद पाटील, नागरिक, आडणे
तानसा नदीवरील नवीन पूल मंजूर झाला; परंतु दोन वर्षे काम बंद असल्याने या भागातील नागरिकांना पावसाळ्यात मोठा त्रास सहन करावा लागत होता. यामुळे या पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ सुरू करावे याबाबत अधिकारी यांना आदेश दिले.- राजेश पाटील, आमदार, बोईसर