वसई: नालासोपारा येथील संतोष भवन मधील ओंकार नगर हौसिंग सोसायटी मध्ये दि. 17 मार्च 2020 रोजी गॅस गळतीमुळे स्फोट झाला होता. या स्फोटांमध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला होता तर चार जण गंभीर जखमी झाले होते.
त्यांच्या नातेवाईकांना भारत गॅस कं.कडून आर्थिक नुकसान भरपाई मिळावी यासाठी बविआ चे आमदार राजेश पाटील यांनी वसई तहसीलदार यांच्यामार्फत पाठपुरावा सुरू केला होता. त्यांच्या मागणीला यश आले असून स्फोटात मृत्युमुखी झालेल्या व जखमी झालेल्या नातेवाईकांच्या खात्यामध्ये भारत गॅस कंपनीद्वारे 14 लाख 16 हजार 849 रुपये जमा करण्यात आल्याची माहिती वसईच्या तहसीलदार उज्वला भगत यांनी लोकमत शी बोलताना दिली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की नालासोपारा संतोष भवन येथील ओंकार सोसायटीमध्ये राहणाऱ्या गंगाधर राजभर त्यांच्या घरी दि. 17 मार्च 2020 रोजी गॅस सिलेंडरची गळती होऊन त्याचा स्फोट झाला. यामध्ये यांचा मुलगा उत्तम व सून नेहा यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी सुशीला देवी, नीलम .चार वर्षाचा नातू सिद्धांत. चार महिन्यांची नात नंदिता गंभीर जखमी झाले होते. घटनेची माहिती मिळताच बविआचे बोईसर विधानसभा आम.राजेश पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली व पीडितांना गॅस कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.
त्या अनुषंगाने त्यांनी वसईचे तहसीलदार यांच्याकडे पीडितांच्या नातेवाईकांना कंपनीकडून तत्काळ नुकसानभरपाई मिळावी यासाठी मागणी केली होती आणि तसा पाठपुरावा ही त्यांनी केला होता. मागील महिन्यात वसईच्या तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारलेल्या उज्वला भगत बनसोड यांनी या मागणीचा कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा केला व सहा महिन्याच्या कालावधी नंतर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले व कंपनीने त्यांच्या नातेवाइकांच्या खात्यामध्ये रु.14 लाख 16 हजार 849 रुपये जमा केल्याची माहिती वसई तहसीलदार यांना दिली एकुणच आमदार राजेश पाटील व वसई महसूल विभागाने त्या मृत व जखमीच्या नातेवाईकांना देऊ केलेल्या या आर्थिक मदतीमुळे यांचे सर्वत्र आभार व्यक्त केले जात आहेत