विरार : अर्नाळा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात लावण्यात येणाऱ्या आगीमुळे प्रदूषण होत असल्याने समुद्रकिनारी येणारे पर्यटक आणि परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
अर्नाळा ग्रामपंचायतीचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अर्नाळा समुद्रकिनाऱ्याला लागून आहे. ग्रामपंचायत हद्दीतून जमा होणारा कचरा या प्रकल्पात आणला जातो. या कचऱ्यातून निघणारे प्लास्टिक वेगळे करून या ठिकाणी बसवण्यात आलेल्या मशीनमध्ये त्याचे विघटन केले जाते. मात्र, अन्य कचरा याच ठिकाणी साठवला जात असल्याने त्याचा मोठा ढीग साचलेला आहे. या परिसरात येणाऱ्या अपप्रवृत्तीच्या लोकांकडून या कचऱ्याला आग लावण्यात येते, अशी माहिती या प्रकल्पात काम करणारे कर्मचारी देतात.
हा प्रकल्प संध्याकाळी ५ नंतर बंद होत असल्याने आग लावण्याचे प्रकार रात्रीच्या वेळेत घडतात; परिणामी ही आग दुसऱ्या दिवशीपर्यंत धुमसत राहते. रात्रीच्या वेळेत हे प्रकार घडत असल्याने आग कोण लावते, याची माहिती मिळत नाही, असे या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, या आगीमुळे मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण होत असल्याने या ठिकाणी येणारे पर्यटक आणि परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.