वसई : वसई पूर्वेकडील औद्योगिक वसाहतीमध्ये लागणाऱ्या आगीच्या घटनांवर तत्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी येथील वसाहतीतच अग्निशमन केंद्र उभारण्याचा प्रकल्प पालिकेने हाती घेतला आहे. लवकरच या प्रस्तावाला मान्यता मिळेल, असे संकेत आहेत. वास्तविक, हा विषय गुरुवारच्या महासभेत येणे अपेक्षित होते. मात्र, निरी आणि परिवहन या महत्त्वाच्या मुद्द्यांमुळे या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले.पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, वालीव येथे अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी महापालिका प्रशासनाने तब्बल ३ कोटी २४ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. हे अग्निशमन केंद्र झाल्यास औद्योगिक वसाहतीला नक्कीच दिलासा मिळणार आहे.वसई पूर्वेला वालीव, सातिवली, गवराईपाडा, भोईदापाडा, चिंचपाडा, गोलाणी मार्ग, वसई फाटा महामार्ग येथे मोठी औद्योगिक वसाहत आहे. या ठिकाणी मुंबईसह ठाणे, पनवेल, पालघर येथील कामगार येतात. येथे अनेक लहान - मोठे कारखाने असून अनेकदा आगी लागण्याच्या घटना घडतात. शॉर्टसर्किट, आग लागून स्फोट यामुळे अनेकदा जीविताला तसेच मालमत्तेला धोका निर्माण होतो.वसई विरार महापालिकेचे सध्या एक केंद्र आणि आठ उपकेंद्रे आहेत. औद्योगिक भागात अग्निशमन केंद्र नसल्याने आग लागल्यास नालासोपारा, आचोळे येथील केंद्राला कळवण्यात येते. घटनास्थळी पोहोचण्यासाठी अग्निशमन दलाला कोंडीतून वाट काढत जावे लागते. मात्र, या दरम्यान नुकसान वाढण्याची शक्यता जास्त असते. अशा घटना भविष्यात टाळता याव्यात, म्हणूनच महापालिकेने प्रभाग समिती ७४ येथे सर्व्हे क्र. ६७ येथे मध्यवर्ती ठिकाणी अग्निशमन केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे.वसई - विरार औद्योगिक वसाहतीला मिळेल दिलासाआगीसारख्या दुर्घटनांवर तत्काळ नियंत्रण आणण्यास या केंद्रामुळे मदतच मिळणार आहे. वसाहतीच्या सुरक्षेसाठी तपासणी, नियमांची माहिती यासाठी वालीव या मध्यवर्ती ठिकाणाहून औद्योगिक क्षेत्रावर नजर ठेवणे सोपे जाणार आहे. त्यामुळे नागरी तसेच औद्योगिक वसाहतीला मोठा दिलासा मिळेल.डम्पिंग ग्राउंडवरीलआगीवर नियंत्रणउन्हाळ्यात डम्पिंग ग्राउंडवरील कचºयाला मोठ्या प्रमाणावर आग लागते. त्यामुळे सर्वत्र काळा आणि विषारी धूर परिसरात पसरून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असतो. अशा घटनांवेळी अग्निशमन दलाला पश्चिमेकडून पूर्वेला पाचारण करावे लागते. त्यामुळे या भागात अग्निशमन केंद्र झाल्यास डम्पिंग ग्राउंडवरील आगी विझवणे शक्य होणार आहे.औद्योगिक वसाहतीत अग्निशमन दलाचे केंद्र उभारण्यासाठी आर्थिक तरतूद केली आहे. यासोबतच ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, अशा ठिकाणी अग्निशमन दलाचे केंद्र होणे ही महापालिका प्रशासनाची प्राथमिकता राहील. पुढील महासभेत हा विषय अग्रस्थानी असेल.- प्रशांत राऊत,स्थायी समिती सभापती.कसे असेल नवीन सुसज्ज अग्निशमन केंद्रतळमजला अधिक एक अशी इमारतवाहनतळात एकूणचार वाहनेएक नियंत्रण कक्ष, कार्यालय कक्ष, प्रतीक्षालयदुर्घटनेचा तपशील ठेवण्यासाठी एक प्रशस्त रेकॉर्ड रूमअग्निशमन दलाचे साहित्य ठेवण्यासाठी सुसज्ज वर्कशॉपपहिल्या मजल्यावर आराम कक्ष, लॉकर, जवानांसाठी निवास व्यवस्था आदी सुविधा.तळमजला २२३.२६ चौ.मी., तर पहिला मजला ५२७.२१ चौ.मी. इतका असेल.
औद्योगिक वसाहतीत अग्निशमन केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 12:22 AM